गडचिरोली : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे विभाजन करण्यात आले असून गडचिरोली, चंद्रपूर गोंदिया जिल्ह्यासाठी स्वतंत्र वनवैभव ज्येष्ठ नागरिक प्रादेशिक विभागाची स्थापना करण्यात आली आहे. अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाची संलग्न असलेल्या महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघात पूर्व विदर्भ ज्येष्ठ नागरिक प्रादेशिक विभाग होता. मात्र याचे १ एप्रिल २०१५ ला विभाजन करण्यात आले आहे. गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या तिन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. या विभागाचे नाव वनवैभव ज्येष्ठ नागरिक प्रादेशिक विभाग गडचिरोली करण्यात आले आहे. या विभागाचे कार्यालय स्नेहनगर येथील धानोरा मार्गावरील वत्सला कुंज येथे आहे. या नवीन विभागाची कार्यकारिणी गठित करण्यात आली असून अध्यक्ष म्हणून पांडूरंग भांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून सी. बी. आवळे, कोषाध्यक्ष डी. एन. बर्लावार, सचिव पां. सो. घोटेकर, सहसचिव र. तू. हेमके, संपर्क सहसचिव एन. टी. काळबांधे, संघटक सचिव डी. डी. सोनटक्के, सदस्य म्हणून ऋचाश्री वानखेडे, केशवराव जेनेकर, शालिनी हिंगाने, पांडुरंग गाढवे यांची निवड करण्यात आली आहे. स्वीकृत सदस्य म्हणून डॉ. निलिमा सिंह, प्रभाकरराव घटूवार, कांताबाई कटरे यांची निवड करण्यात आली आहे. तीन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र प्रादेशिक विभाग स्थापन करण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी तत्काळ सोडविण्यास मदत होणार आहे. यामुळे ज्येष्ठांनी समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना नागपूर येथे जावे लागत होते. (नगर प्रतिनिधी)
ज्येष्ठांच्या महासंघाचे विभाजन
By admin | Updated: June 1, 2015 02:05 IST