अबकारी कायदा रद्द करण्याची मागणी : सराफा व्यावसायिकांचा बंदचगडचिरोली : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सराफा व्यावसायावर एक टक्का अबकारी कर लागू केला आहे. तसेच एक्साईज नावाचा काळा अबकारी कायदा लागू केल्याने सराफा व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे. सदर कायदा रद्द करून सराफा व्यावसायिकांना न्याय देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी सराफा असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य व इतर सराफा व्यावसायिकांनी रविवारी खा. अशोक नेते यांना घेराव घातला. त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी सराफा जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष रत्नाकर बोगोजुवार, उपाध्यक्ष नंदू वाईलकर, सचिव नितीन हर्षे, कोषाध्यक्ष नितीन चिमड्यालवार, शहर अध्यक्ष गजानन येनगंधलवार, उपाध्यक्ष सुधाकर बोगोजुवार, सचिव सुरेश भोजापुरे, सुधाकर येनगंधलवार, जगन्नाथ पाटील, संजय हर्षे, श्रीकांत डोमळे, नरेंद्र बोगोजुवार, कुमोद बोबाटे, चंदू वाईलकर, मारोती भांडेकर, कुणाल नागरे, शिवाजी पवार, मनसूर सेठ, जगदीश डोमळे, संजय देवोजवार, अविनाश विश्रोजवार आदी उपस्थित होते. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सराफा व्यावसायावर एक टक्का अबकारी कर लागू करून अबकारी कायद्यात अनेक अन्यायकारक पोटकलमांचा समावेश केला आहे. यामुळे जिल्हाभरातील सराफा व्यावसायिक कारवाईची भीतीने प्रचंड धास्तावले आहे. सरकारच्या या कायद्याविरोधात जिल्हाभरातील सराफा व्यावसायिकांनी गेल्या पाच दिवसांपासून आपली सराफा प्रतिष्ठाने बंद ठेवून सरकारचा निषेध नोंदविला आहे. बाराही तालुक्यात सराफा प्रतिष्ठान बंद आंदोलन सुरू आहे. घेराव आंदोलनादरम्यान संतप्त सराफा व्यावसायिकांनी अबकारी कायद्याच्या मुद्यावर केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करून निषेध केला. (स्थानिक प्रतिनिधी)
खासदारांना केला घेराव
By admin | Updated: March 7, 2016 01:04 IST