जिल्ह्यातील बंदीचा घेत आहे फायदा : पोलिसांची डोकेदुखी वाढलीगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असल्यानंतरही जागोजागी अवैध दारूविक्री जोर धरत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अवैध दारू विक्रीच्या विरोधात विशेष पोलीस पथकाद्वारे धाडसत्र सुरू केले असले तरी अवैध दारू विक्री रोखण्यात पोलीस यंत्रणेला अजुनही मोठे यश प्राप्त करता आले नाही. यामागे मुख्य कारण म्हणजे, जिल्हा सीमेला लागून असलेल्या तेलंगणा, आंध्रप ्रदेश व छत्तीसगड राज्यातून दररोज हजारो लिटर दारूचा पुरवठा करण्यात येत असल्याने परप्रांतीय अवैध दारूविक्रेते मालामाल होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या परप्रांतीय दारू विक्रेत्याविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांसमोर विविध अडचणी येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातही अवैध दारू विक्रीच्या विरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. दररोज पोलीस विभागाकडून शहर व ग्रामीण भागात धाडी घातल्या जात आहे. यात अनेक अवैध दारू विक्रेत्यांना अटक करण्यात येत आहे. त्यामुळे दारू विक्रेत्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. गडचिरोली शहरातील अनेक अवैध दारूविक्रेते भुमिगत झाले असून परप्रांतातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू शहरात व ग्रामीण भागात उपलब्ध केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)चंद्रपूर जिल्ह्यात दारूविक्री बंद झाल्याने गडचिरोली जिल्ह्यात होणाऱ्या दारू पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. जिल्हा सीमांच्या परिसरात पोलिसांनी नाकेबंदी करून दारूची अवैध वाहतूक रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु अहेरी तालुक्याला लागून असलेल्या प्राणहिता नदीच्या मार्गाने अवैध दारू विक्रेते मोठ्या प्रमाणावर दारूची तस्करी करीत आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्याच्या सीमा या भागाला लागून आहे. पोलिसांची नाकेबंदी या भागात नसल्याने या भागातून अहेरी, आलापल्लीत लाखो रूपयांची दारू दररोज उतरविली जात आहे व तेथून ती जिल्हाभर पाठविली जात आहे. तसेच तहसील, मुख्यालय, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर दारू आणली जाते. अहेरी तहसीलचा ग्रामीण भाग हा नक्षली कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील भाग आहे. त्यामुळे येथे रात्रीच्या वेळी ही दारू उतरविली जाते.
परप्रांतीय दारूचा पूर
By admin | Updated: July 4, 2015 02:29 IST