जि. प. सीईओंकडे तक्रार : ग्रामपंचायत पेंटिंगच्या नावाखाली चामोर्शी : १४ व्या वित्त आयोगाच्या शासन निर्णयात तसेच ग्रामपंचायतीच्या आराखड्यात समावेश नसतानासुद्धा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाचा गैरवापर करून ग्रामपंचायत घोषवाक्य पेंटिंगच्या कामावर चामोर्शी येथील पंचायत विस्तार अधिकारी बी. आर. मुद्दमवार यांनी १४ लाख रूपयांची अफरातफर केली, असा आरोप करीत मुद्दमवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी माल्लेरमाल येथील रहिवासी खुशाल पत्रूजी कावळे यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात कावळे यांनी शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आमच्या सभेत निर्देश दिले असल्याचे सांगून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घोषवाक्य लिहून प्रचार व प्रसार केला नाही तर सीईओ साहेब ग्रामसेवकांना निलंबित करणार आहेत, अशी धमकी मुद्दमवार यांनी तालुक्यातील ग्रामसेवकांना दिली. ग्रामपंचायतीअंतर्गत घोषवाक्य पेंटिंग करण्यासाठी अधिनस्त ग्रामसेवकांवर त्यांनी दबाव टाकला. सीईओंचे नाव सांगून व बीडीओंची दिशाभूल करून मुद्दमवार यांनी घोषवाक्य पेंटिंग करण्यासाठी ग्रामसेवकांना पत्र दिले. ३५ ते ४० ग्रामपंचायतींना आपल्या मर्जीतील दोन ते तीन पेंटर लावून दोन ते तीन हजार रूपयांची घोषवाक्य पेंटिंगचे काम करवून घेतले. अर्ध्याअधीक ग्रामपंचायतींना पेंटिंगही करण्यात आली नाही. मात्र पंचायत विस्तार अधिकारी मुद्दमवार यांनी ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रति ग्रामपंचायत ३४ हजार रूपयांप्रमाणे एकूण १४ लाख रूपये हडप करून आर्थिक भ्रष्टाचार केला, असे खुशाल कावळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. सीईओंचे नाव सांगून नियमबाह्यरित्या शासकीय निधीचा अपहार केल्यामुळे मुद्दमवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी कावळे यांनी निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी) माझा या तक्रारीसंदर्भात तीळमात्रही संबंध नाही. आपण कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही. तसेच ग्रामपंचायतींना कोणत्याही स्वरूपाचे पत्रही दिले नाही. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करा, असे ग्रामसेवकांना सांगितले नाही. शासकीय कार्यक्रमाचे संदेश फलक लेखन करणे हे संबंधित ग्रामपंचायतीवर अवलंबून आहे. पेंटिंग करा अथवा करू नका असे कोणत्याही ग्रामसेवकाला व ग्रामपंचायतीला आपण सांगितले नाही. संबंधितांनी आपल्या संदर्भात केलेली सदर तक्रार पूर्णत: खोटी आहे. - बी. आर. मुद्दमवार, पंचायत विस्तार अधिकारी, पंचायत समिती, चामोर्शी
पंचायत विस्तार अधिकाऱ्याने १४ लाखांचा निधी हडपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 01:32 IST