चंद्रपूर जिल्ह्यातून चामोर्शीकडे अवैधरीत्या दारूची वाहतूक होणार आहे, अशी गाेपनीय माहिती गडचिरोलीचे एसडीपीओ प्रणील गिल्डा यांना मिळाली होती. त्या आधारे त्यांचे पथक व चामोर्शी पाेलिसांनी हरणघाट घाटावरील नावावर सापळा लावला होता. त्यानुसार, एक लाल रंगाची स्कॉर्पिओ येताना दिसल्याने, तिला अडवून वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये १ लाख ५४ हजारांचा दारूसाठा होता. ९० मिली मापाच्या १०० निपा याप्रमाणे २२ बॉक्स (एकूण २,२०० निपा) जप्त केल्या. वाहनाची किंमत पाच लाख रुपये, असा एकूण ६ लाख ५४ हजार रुपयांचा माल ताब्यात घेतला.
दारूची वाहतूक करणारे सदर वाहन हे शंकर रॉय चामोर्शी यांच्या मालकीचे असून, वाहन चालक अविनाश मारोती नैताम व सोबत असलेला मनोहर केशव खाले यास ताब्यात घेण्यात आले. यातील तिसरा आरोपी श्रीकांत बोइनवार हा फरार आहे. सदर दारू ही चंद्रपूर जिल्ह्यातील जुनासुर्ला येथील मारकवार यांच्या भट्टीतील आहे, असे आराेपींनी सांगितले. या तीनही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन चामोर्शी येथे गुन्हा नोंद करून, आरोपीस अटक करण्यात आली.