बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : भामरागड, एटापल्ली तालुक्यातील परिस्थितीएटापल्ली : मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड, एटापल्ली तालुक्यात दुर्गम भागातील अनेक रस्ते व पुलालगतचा भाग वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे या भागातील वाहतुकीवरही परिणाम झाला असून या रस्त्यांच्या दुरूस्ती कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भामरागड-आरेवाडा मार्गावर असलेल्या पुलाजवळचा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे. तसेच एटापल्ली-गट्टा मार्गावरील बांडे नदीवर आलदंडी पुलाजवळचा रस्ताही खचला आहे. मागील आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली. मात्र अजूनही सार्वजनिक बांधकाम खात्याने याची दुरूस्ती केलेली नाही. एटापल्ली-गट्टा मार्गाला जोडण्यासाठी २००० ते २००६ या कालावधीत सीमा सडक संघटनेच्या माध्यमातून आलदंडी नदीवरील पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. या कामाला माओवाद्यांचा प्रचंड विरोध असताना बीआरओचे तत्कालीन अभियंता गणेशन यांच्या पुढाकारातून हा रस्ता बांधण्यात आला. तेव्हापासून या रस्त्याची डागडुजीही करण्यात आलेली नव्हती. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस झाला. या पावसात एटापल्ली-गट्टा मार्गावरील या पुलाचा काही भाग व रस्ता खचून गेला आहे. त्यामुळे वाहतूक प्रभावित झाली आहे. हा रस्ता त्वरित दुरूस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
अतिवृष्टीने अनेक रस्ते गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 01:23 IST