गडचिरोली : गडचिरोली येथील आशा चष्माघर या दुकानमालकास ग्राहकाला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी एक हजार रूपये व तक्रारीचा खर्च ५०० रूपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २४ जून रोजी दिला आहे. गडचिरोलीच्या रहिवासी कांचन रामदास म्हशाखेत्री यांनी ६ नोव्हेंबर २०१४ रोजी आशा चष्माघर, धानोरा रोड गडचिरोली येथे डॉक्टरांच्या सल्लेनुसार जुना चष्मा दिला व नवीन चष्मा/काच एक तासात बनवून मिळेल, असे सांगितले. त्यानंतर म्हशाखेत्री एक तासामध्ये दुकानामध्ये चष्मा घेण्यासाठी गेले असता, चष्मा तयार नसल्याने त्यांना वाट पाहावी लागली. १५ ते २० मिनिटात आशा चष्माघरने म्हशाखेत्री यांचा चष्मा बनवून दिला व त्याचे पैसे त्यांना देण्यात आले. त्याचवेळला दुसरा तुटलेला चष्माही दिला. १७ नोव्हेंबर २०१४ रोजी ११ दिवसानंतर म्हशाखेत्री आशा चष्माघरकडे गेल्यावर तुम्ही चष्मा बनवू नका व माझा तुटलेला चष्माही परत करा, असे सांगण्यासाठी गेले. त्यावर आशा चष्माघरचे प्रोप्रायटर यांनी तुटलेल्या चष्माच्या एक भाग दिसत नाही. त्यामुळे मदतनिसाकडून दोन्ही भाग शोधून परत करतो, असे सांगितले. त्यानंतर सात-सात दिवसांच्या कालावधीने जाऊनही त्यांना चष्मा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी तक्रार केली.