मुलचेरा : तालुक्यातील मुखडी येथे चेन्ना नदी मध्यम प्रकल्पाच्या बांधकामास शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र या प्रकल्पाच्या क्षेत्रात ज्या शेतकऱ्यांची जमीन येते त्या शेतकऱ्यांनी जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या प्रकल्पा संदर्भात मुखडी येथे वनहक्क समितीची ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा सोमवारी घेण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार एस. एस. पठाण, वन परिक्षेत्राधिकारी मेड्डीवार, मध्यम पाटबंधारे विभाग चंद्रपूरचे सहायक अभियंते विभूते, मंडळ अधिकारी एस. एस. भडके, नगर पंचायत उपाध्यक्ष देवाजी चौधरी, नगरसेवक दिलीप आत्राम, तलाठी उईके, ग्राम पंचायत गोमणीचे सचिव कुमेर उरेले, गोमणीचे सरपंच उपस्थित होते. सभेदरम्यान मंडळ अधिकारी भडके यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती सादर केली. या प्रकल्पाला मूळ प्रशासकीय मान्यता १३ मे १९७७ रोजी प्राप्त झाली आहे. त्यावेळी या प्रकल्पाच्या निर्मितीचा खर्च १ कोटी ८२ लाख ५५ हजार रूपये एवढा होता. प्रकल्पाची सिंचन क्षमता २ हजार ३३० हेक्टर आर. एवढी आहे. या प्रकल्पाच्या कालव्यासाठी ५३.७२ हेक्टर आर. खासगी जमीन ३७२.७४ हेक्टर आर वन जमीन अशी एकूण ४२६.४६ हेक्टर आर. जमीन आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिक मुखडी येथील वन हक्क समितीला मंजूर झालेली वनहक्क दाव्याची जमीन येते. त्याचबरोबर काही वैयक्तिक वनपट्टे येतात. सदर प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांकडून नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र जोपर्यंत या प्रकल्पाच्या पाण्याचा फायदा आपल्याला होत नाही. तोपर्यंत नाहरकत प्रमाणपत्र देणार नाही, असा इशारा गावकऱ्यांनी दिला. या प्रकल्पाबाबत अधिक विचार करून निर्णय घेण्याचा सल्ला तहसीलदारांनी गावकऱ्यांना दिला. (तालुका प्रतिनिधी)
चेन्नाला जमीन देण्यास मुखडीवासीयांचा विरोध
By admin | Updated: August 31, 2016 01:46 IST