गडचिरोली : ग्राम पंचायत निवडणुकीसाठी फक्त आॅनलाईन अर्ज करण्यासाठीची अट निवडणूक आयोगाने मागे घेतल्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातील अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.संगणक नाही, संगणक आहे, पण वीज नाही, सायबर कॅफेवर निवडणुकीचा अर्ज भरायला शंभर रुपये शुल्क नाही, अशा अनेक अडचणींमुळे संगणक साक्षर नसलेल्या अनेकांना निवडणुकीच्या हक्कापासून मागील वर्षी वंचित राहावे लागले होते. मात्र २४ व ३० एप्रिल रोजी होणाऱ्या ग्राम पंचायत निवडणुकीसाठी संगणक साक्षरतेची छुपी अडचण निवडणूक आयोगाने रद्द केल्याने खऱ्या अर्थाने ग्राम पंचायत निवडणुका रंगणार आहेत. निवडणूक आयोगाने जिल्ह्यासह राज्यातील ग्राम पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीत केला. एप्रिल ते जुलै २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ४२३ ग्राम पंचायतीमध्ये सार्वत्रिक व पोटनिवडणुका होणार होत्या, मात्र आता निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील तीन ग्राम पंचायतीच्या निवडणुका रद्द केल्या आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात माहे एप्रिल ते जुलै या महिन्यादरम्यान मुदत संपणाऱ्या ४२० ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणूक आयोगाने सुरुवातीला ग्राम पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतेवेळी ग्राम पंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना केवळ आॅनलाईन पध्दतीनेच अर्ज भरता येईल, अशी अधिसूचना निवडणूक आयोगाने काढली होती. या अटीमुळे अनेक अशिक्षित आणि अल्पशिक्षित उमेदवारांची डोकेदुखी वाढली होती. ग्रामीण भागात संगणक उपलब्ध नसल्याने आता निर्धारित वेळेत अर्ज कसा दाखल करावयाचा, असा प्रश्न निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने आॅनलाईन अर्ज भरण्याची जाचक अट रद्द करावी, अशी मागणी होत होती. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारीया यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन ग्राम पंचायत निवडणुकीची आॅनलाईन अर्जाची अट रद्द करण्यात येत असल्याचे जिल्ह्याच्या निवडणूक विभागाला सांगितले आहे. आता जिल्ह्यातील ३३७ ग्रा. पं. च्या सार्वत्रिक व ८३ ग्रा. पं. च्या पोटनिवडणुका अशा एकूण ४२० ग्रा. पं. च्या निवडणुका होणार आहेत. या निर्णयामुळे ग्राम पंचायतीची निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
आॅनलाईन अर्जाची अट रद्द
By admin | Updated: April 2, 2015 01:49 IST