गडचिरोली : १ लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर ३ लाखापर्यंतच्या कर्जावर अवघे दोन टक्के व्याज आकारण्याच्या डॉ. पंजाबराव देखमुख व्याज सवलत योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. जिल्ह्यातील अशा प्रकारचे कर्ज घेऊन त्याची विहित मुदतीत परतफेड केलेल्या ३६ शेतीपुरवठा सहकारी संस्थेच्या अनुसूचित जातीच्या ३३४ सभासदांना १ लाख ४९ हजार ७४६ रूपयाचे अनुदान मंजूर झाले आहे. सदर अनुदान मंजूर झाल्याबाबतचे निबंधक व आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिरोली कार्यालयाला पत्र प्राप्त झाले. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका तसेच ग्रामीण बँकामार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. लहान शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शून्य टक्के दराने कर्ज देण्याची योजना शासनाने हाती घेतली आहे. विहित वेळात म्हणजे, जून ते जून या कालावधीत घेतलेल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळतो. या योजनेंतर्गत ३६ सहकारी संस्थेच्या ३३४ सभासदांना अनुदानाची रक्कम अदा करण्यासाठी २०१४-१५ या वित्तीय वर्षात जिल्हा उपनिबंधक कार्यालयास दीड लाख रूपयाचे अनुदान प्राप्त झाले असल्याची माहिती मिळाली आहे. या योजनेचे अनुदान मंजूर झालेल्या सभासदांमध्ये आरमोरी, चामोर्शी, कुरखेडा, अहेरी व धानोरा तालुक्यातील सभासदांचा समावेश आहे. अनुदानाची सदर रक्कम जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या वतीने धनादेशाद्वारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामार्फत सभासदांना वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र सभासदांचे मनोबल उंचावणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
व्याज सवलत योजनेतून एक लाख ४९ हजार मंजूर
By admin | Updated: February 7, 2015 23:23 IST