दोन अपघात : चारचाकी वाहनाने दिली देऊळगावजवळ झाडाला धडकआरमोरी/कुरखेडा : आरमोरी तालुक्यातील देऊळगावच्या वळणावर चारचाकी वाहनाने झाडाला धडक दिल्याने या अपघातात एकजण जागीच ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले. तर कुरखेडा तालुक्यातील दुसऱ्या अपघातात दोन शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना एकाच दिवशी घडली.निकेश शंकर गुरनुले (२२) रा. शिवणी ता. गडचिरोली असे देऊळगावच्या वळणावरील अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. खुशाल पुरूषोत्तम पोरटे (२३), जागृत मनोहर गजभिये (२५) हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. कुरखेडा तालुक्यात झालेल्या अपघातात विस्वा तारक गोस्वामी (२४) रा. देसाईगंज व बाबासाहेब गोविंदा रामटेके (२५) रा. वडेगाव हे दोन शिक्षक गंभीर जखमी झाले आहे.शिवणी येथील किरण ताडपलीवार यांच्या मालकीची एमएच-२०-बी-६९९९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने खुशाल पोरटे, निकेश गुरनुले व जागृत गजभिये हे नागपूरवरून गडचिरोलीकडे २ डिसेंबरच्या रात्री येत होते. दरम्यान आरमोरीपासून १४ किमी अंतरावर देऊळगाव नजीकच्या वळणावर चारचाकी वाहनाने झाडाला जबर धडक दिली. यात निकेश गुरनुले हा जागीच ठार झाला तर वाहनचालक खुशाल पोरटे व जागृत गजभिये हे गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही पोलिसांनी आरमोरीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र या दोघांचीही प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना आज बुधवारला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. सदर चारचाकी वाहन खुशाल पोरटे हा चालवित होता. त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने झाडाला जबर धडक बसली. यात चारचाकी वाहन पूर्णत: क्षतीग्रस्त झाले.आरमोरी पोलिसांनी या घटनेसंदर्भात वाहनचालक खुशाल पोरटे याचेवर भादंविचे कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, ३०५ अ व मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बच्छलवार करीत आहेत. (प्रतिनिधी)
एक ठार, चार गंभीर जखमी
By admin | Updated: December 3, 2014 22:48 IST