प्रशासकीय मान्यता प्रदान : सिमेंट रोड, नाली बांधकाम होणारदेसाईगंज : शहरात १ कोटी १४ लाख ८ हजार रूपयांची विविध विकास कामे करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता प्रदान केली आहे. देसाईगंज नगर परिषदेला २०१४-१५ या वर्षात १ कोटी ८६ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी २९ लाख रूपयांचा निधी शिल्लक होता. त्याचबरोबर २०१५-१६ या आर्थिक वर्षातही देसाईगंज नगर परिषदेला ८४ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला. दोन्ही वर्षांचा मिळून १ कोटी १४ लाख रूपयांची विकास कामे करण्याचा आराखडा नगर परिषदेने तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता प्रदान केली आहे. या निधीतून विर्शी वॉर्डातील प्रभाग क्र. ३ मध्ये सीसी रस्त्यांचे कामे करणे, माता वॉर्ड, बिरसामुंडा चौक ते राईस मिलपर्यंत नालीचे बांधकाम करणे, माता वॉर्ड, आरमोरी, देसाईगंज मार्ग, आदर्श शाळा, बिरसा मुंडा चौक व पुढे राईस मिलपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, माता वॉर्ड- आरमोरी मार्गावरील आदर्श शाळा ते बिरसा मुंडा चौक नालीचे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी १५ लाख २१ हजार ४०० रूपये मंजूर केले आहेत. जुनी वडसा वॉर्ड प्रभाग क्र. ४ मधील प्रकाश सांगोळे ते नबाब कुरेशी व पुढे इकबाल शेख यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या नाली बांधकामासाठी ३ लाख १८ हजार १०० रूपये मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व कामांना १ कोटी १४ लाख ८ हजार ४०० रूपये खर्च येणार आहे. नगर विकास विभाग व संचालक नगर परिषद संचालनालय मुंबई यांनी वेळोवेळी काढलेले शासन निर्णय, परिपत्रक, मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही सर्व कामे ई-निविदा प्रक्रिया राबवूनच करण्यात यावी, नगर रचना कार्यालयामार्फत नकाशांना मान्यता प्रदान करावी, अशा सूचना केल्या आहेत.
देसाईगंजात एक कोटीची कामे
By admin | Updated: April 27, 2016 01:26 IST