गडचिरोली : गोंदिया येथे ओबीसी कार्यकर्त्यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना ओबीसी शिष्यवृत्ती व फ्रि शिपचे काय झाले, अशी विचारणा केल्यावर त्यांनी ओबीसी समाजाविषयी असामाजिक वक्तव्य केले. या घटनेचा निषेध नोंदवित सामाजिक न्यायमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीला घेऊन गडचिरोली येथे ओबीसी संघर्ष कृृती समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिग्रेड, सुशिक्षित बेरोजगार संघटना आदींच्या वतीने गुरूवारी इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदनही सादर करण्यात आले.या निवेदनात ओबीसीच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा, फ्रिशिपसाठीची उत्पन्न मर्यादा क्रिमिलेअरच्या उत्पन्न मर्यादेत करण्यात यावी, सामाजिक न्याय मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेणारा विद्यार्थी लोकेश येरणे याच्या आत्महत्येची सीआयडी चौकशी करण्यात यावी, केंद्र शासनाची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती ओबीसींनाही १०० टक्के देण्यात यावी, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ओबीसींना देण्यात येणारे शैक्षणिक कर्ज प्रत्यक्ष खर्चाऐवढे देण्यात यावे यासह १४ मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनाला ओबीसी कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अरूण मुनघाटे, दादाजी चुधरी, रमेश भुरसे, जे. वाय. साळवे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष दादाजी चापले, दिलीप म्हस्के, भाऊराव खिरटकर, पुरूषोत्तम मस्के, किरण कारेकर, भास्कर बुरे, योगराज बुरे, अविनाश गौरकर, जगन्नाथ ब्राम्हणवाडे, पांडुरंग घोटेकर, बी. बी. होकम, पांडुरंग भांडेकर, केशवराव सामृतवार, प्रभाकर वासेकर, रमेश मडावी, खुशाल वाघरे, खरवडे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
सामाजिक न्याय मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ओबीसींचे धरणे
By admin | Updated: April 8, 2016 01:17 IST