चामोर्शी : शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्थानिक व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पूर्वीपासून शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांवर अन्याय होत आहे. पूर्वीपासून शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांना कायम ठेवण्याच्या मागणीकरिता शुक्रवारला चामोर्शी पंचायत समितीसमोर शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्यावतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जुन्याच स्वयंपाकी महिलांना कायम ठेवण्याबाबतचे निवेदन संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी यांना देण्यात आले. महाराष्ट्र शासनाने शालेय पोषण आहाराच्या जबाबदारीतून मुख्याध्यापक, शिक्षकांना मुक्त करण्याच्या हेतूने २६ फेब्रुवारी २०१४ शासनाने आदेश जाहीर केला. त्यानुसार आहार पुरवठ्याची किंवा शिजविण्याची (त्या करिता स्वयंपाकी निवडण्याची) जबाबदारी बचत गटांना देण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे स्थानिक व्यवस्थापन समिती आपल्या मनमानी कारभारामुळे व राजकारणी व्देषापोटी जुन्या कार्यरत महिलांना, बचत गटांना डावलून आपल्या नातेवाईकांना व मर्जीतील लोकांना निवडण्याचे धोरण सुरू केले. त्यामुळे या योजनेअंतर्गत सुरूवातीपासून काम करणारे किंवा १० ते १२ वर्षांपासून काम करणाऱ्या ९० टक्के महिलांवर बेरोजगारीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. पोषण आहार शिजविणाऱ्या विधवा, परित्यक्ता किंवा घटस्फोटीत महिलांना उपासमारीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे समस्यांचे निवारण करण्यासाठी पं.स. समोर निदर्शने करून संवर्ग विकास अधिकाऱ्यांना अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी शालेय पोषण आहार योजनेत जुन्या व सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांना आहार शिजविण्याच्या कामात कायम ठेवण्याकरिता परीपत्रक काढावे, २ फेब्रुवारी २०११ च्या शासन परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्यात यावे, २६ फेब्रुवारी २०१४ च्या परीपत्रकानुसार शाळा व्यवस्थापन समित्यांनी बचत गट निवडण्याची कार्यवाही केली आहे. ती कार्यवाही त्वरित रद्द करण्याचे आदेश द्यावे, पोषण आहार कर्मचाऱ्यांना दरमहा १ हजार रूपये मानधन केवळ १० महिने देण्याची तरतूद आहे. त्यात सुधारणा करून किमान पाच हजार रूपये प्रतिमाह मानधन वाढवून पूर्ण वर्षाकरिता मानधन द्यावे, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन व इंधन बील पहिली ते पाचवी करिता १ रूपये २१ पैसे व सहावी ते आठवीकरिता १ रूपये ५१ पैसेनुसार कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करावे आदी मागण्यांचा समावेश होता. निवेदन देताना पोषण आहार कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, जिल्हा उपाध्यक्ष कुंदा चल्लीलवार, शालू कागदेलवार, मनीषा कोवे, टीकाराम धोटे, बंडू कोवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
पोषण आहार कर्मचाऱ्यांचे धरणे
By admin | Updated: July 12, 2014 01:16 IST