आरमोरी : या परिसरातील महिला वर्गाला नर्सिंग स्कूलच्या माध्यमातून स्वत:च्या आर्थिक उत्कर्षासोबत आरोग्य सेवेसारख्या क्षेत्रात काम करून सामाजिक सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांनी देशात आपल्या सेवेचा ठसा उमटवावा, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल धात्रक यांनी केले. येथील साई नर्सिंग स्कूलमध्ये शुक्रवारी लैंगिक व प्रजनन आरोग्य जनजागृती दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर साळवे होते. यावेळी डॉ. धात्रक यांनी किशोरवयातील मुलींना लैंगिक आजाराबद्दल मार्गदर्शन केले. तसेच त्याबाबत घ्यावयाची काळजी, याबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी कोविड महामारीवर प्रकाश टाकला. एकीकडे संपूर्ण जगात कोविडने दहशत माजविली असताना खऱ्या अर्थाने योद्धा म्हणून कोणी समोर आले असेल तर ती आरोग्य यंत्रणा आहे. त्यातही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांसाठी २४ तास सेवा देणाऱ्या परिचारिका (नर्स) आहेत. ज्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता फ्लोरेन्स नाईटँगल यांनी शत्रूच्या कॅम्पमध्ये जाऊन सेवा केली आणि कुठलाही भेदभाव न ठेवता जो संदेश जगापुढे ठेवला तो प्रेरणादायी आहे. अशी थोर परंपरा असणाऱ्या परिचारिका निर्माण करणारे प्रशिक्षण आरमोरीसारख्या ठिकाणी उपलब्ध असणे ही समाधानाची बाब आहे. त्यात आता जीएनएम अभ्यासक्रमाकरिता महाराष्ट्र शासनाने आणि स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंगकडून परवानगी मिळणे ही बाब खऱ्या अर्थाने आरमोरी तालुक्यासाठी मानाचा तुरा असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका नेहा ओळख यांच्या मार्गदर्शनात मनीषा बारापात्रे, चंदा कन्नाके, भूषण ठकार, स्वप्निल धात्रक, सुनिता हेडाऊ, पिंकी साळवे, वासुदेव फुलबांधे, केशव सेलोटे यांनी सहकार्य केले.