महसूल विभागाची कारवाई : अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ गडचिरोली : चामोर्शी मार्गावर असलेल्या वद्धाश्रम परिसरात काही नागरिकांनी अतिक्रमण करून जागा हडपण्याचा प्रयत्न केला. या अतिक्रमणधारकांना तहसील कार्यालयाच्या वतीने अतिक्रमण काढण्याबाबतची नोटीस बजाविली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ माजली आहे. वृध्दाश्रम इमारतीच्या सभोवताल असलेल्या दोन ते तीन एकर जागेवर जवळपास ४० ते ५० अतिक्रमणधारकांनी मागील तीन वर्षांपासून अतिक्रमण करून झोपड्या निर्माण केल्या आहेत. या झोपड्यांमध्ये काही नागरिक वास्तव्यास आहेत. तर काही नागरिकांनी केवळ झोपडी उभारून व काटेरी कुंपन करून जागेवर ताबा मिळवून ठेवला आहे. एवढेच नाही तर अगदी वृध्दाश्रमाला रेटून झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. सदर जागा महसूल विभागाच्या अखत्यारित येते. या झोपड्या हटविण्यात याव्या, अशी मागणी काही नागरिकांनी केल्यानंतर महसूल विभागाने अतिक्रमणधारकांना दोन दिवसांपूर्वी नोटीस बजाविली आहे. या नोटीसमध्ये सात दिवसांच्या आत अतिक्रमण हटविण्यात यावे, अन्यथा अतिक्रमण काढण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ माजली आहे. दिवसेंदिवस शहरात अतिक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिक्रमणधारकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)
वृद्धाश्रम परिसरातील अतिक्रमणधारकांना नोटीस
By admin | Updated: March 5, 2017 01:25 IST