गडचिरोली : स्थानिक पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर यांनी पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व सदस्यांना विश्वासात न घेताच पंचायत समितीचा विकास आराखडा परस्पर तयार करून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सादर केला. त्यामुळे त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई, असे निर्देश आ. डॉ. देवराव होळी यांनी दिले. स्थानिक पंचायत समितीच्या आवारात गुरूवारी सर्वसाधारण वार्षिक आढावा सभा पार पडली. या सभेदरम्यान पंचायत समितीचे सभापती देवेंद्र भांडेकर यांनी ही गंभीर बाब आमदारांच्या उजेडात आणून दिली. वार्षिक आढावा सभा आ. डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती विश्वास भोवते, जि. प. सदस्य प्रशांत वाघरे, पंचायत समितीचे सभापती देवेंद्र भांडेकर, उपसभापती किशोर गद्देवार, पं. स. सदस्य पुरूषोत्तम गायकवाड, सविता कावळे, प्रमोद धारणे, नगराध्यक्ष निर्मला मडके, पं. स. सदस्य मंजुळा पदा, राजश्री मुनघाटे, अनील बांबोळे, गावतुरे आदी उपस्थित होते. आढावा बैठकीला जे अधिकारी अनुपस्थितीत होते, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना आमदारांनी दिली. आढावा बैठकीदरम्यान प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी विकास कामांचा आढावा आमदारासमोर सादर केला. त्यावर काही नागरिकांनी अधिकारी हे चुकीची माहिती देऊन सभा अध्यक्ष व जनतेची दिशाभूल करीत असल्याचे लक्षात आणून दिले. गडचिरोलीच्या बीडीओकडे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे पंचायत समितीकडे दुर्लक्ष होत आहे. याचा विपरित परिणाम विकास कामांवर होत आहे. त्यामुळे कुत्तीरकर यांच्याकडून पंचायत विभागाचा प्रभार काढण्यात यावा, अशीही मागणी उपस्थित नागरिकांनी केली. निधी वेळेत खर्च करून नागरिकांना चांगली सेवा देण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले. (नगर प्रतिनिधी)
सहमतीविनाच पं. स. चा आराखडा
By admin | Updated: February 5, 2015 23:10 IST