पत्रकार परिषदेत सदस्यांचा आरोप : धानोराची अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूकधानोरा : येथील नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारांची निवड गुरूवारी करण्यात आली. मात्र नगर पंचायत सदस्यांची गुप्त मतदानाची मागणी पीठासीन अधिकाऱ्यांनी फेटाळून लावत नगराध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड चुकीच्या प्रक्रियेतून केली, असा आरोप येथील नगर पंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेतून गुरूवारी केला.धानोरा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्याची मागणी सात सदस्यांनी केली होती. परंतु सदर नियम नसल्याचे सांगत पीठासीन अधिकाऱ्यांनी मागणी फेटाळून लावली. उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज करण्याची वेळ सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत होती. उपाध्यक्षपदासाठी अनुक्रम १ ते ४ अर्ज वितरित करण्यात येऊन संपूर्ण अर्ज भरण्यात आले. यापैैकी ३ नंबरचा अर्ज ललीत बरच्छा तर उर्वरित ३ अर्ज नरेश बोडगेवार यांचे होते. सदर दोन उमेदवारांचे ४ अर्ज पीठासीन अधिकाऱ्यांनी स्वीकारले. उपाध्यक्षपदाच्या अर्जाची छाननी सुरू असताना उपाध्यक्ष पदाचा अर्ज वेगवेगळ्या प्रकारचा असल्यामुळे ललीत बरच्छा यांचा अर्ज रद्द करण्यात यावा, असा आक्षेप सदस्य कृष्णराव उंदीरवाडे यांनी घेतला. मात्र पीठासीन अधिकाऱ्यांनी सदर मागणी फेटाळून लावली. तसेच उपाध्यक्ष पदाचा अर्ज वैध ठरविल्यानंतर नियमाप्रमाणे अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळे देणे गरजेचे होते. परंतु वेळ न देता छाननीनंतर लगेच उपाध्यक्ष पदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड ज्याप्रमाणे करण्यात आली, त्या पद्धतीने विशेष ठराव लिहिण्यात आला नसून त्यावर नगर पंचायत सदस्यांची स्वाक्षरी घेण्यात आली नाही. निवड प्रक्रियेबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत पीठासीन अधिकाऱ्यांचा निषेध करीत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नरेश बोडगेवार, कृष्णदास उंदीरवाडे, सुभाष धाईत, विनोद निंबोरकर, रेखा हलामी, लीना साळवे, गीता वालको, साईनाथ साळवे, गजानन परचाके, प्रेमलाल वालको, राजू वाघमारे, अनंत साळवे हजर होते. (तालुका प्रतिनिधी)
न. पं. पदाधिकाऱ्यांची निवड चुकीची
By admin | Updated: November 28, 2015 02:45 IST