कोरची : आठ महिन्यांपूर्वी कृषी वीज पंपासाठी महावितरण कंपनीकडे डिमांड भरूनही अद्याप वीज जोडणी देण्यात न आल्याचा प्रकार कोरची तालुक्यात घडला आहे. यासंदर्भात शेतकऱ्याच्या कृषी गटाने आ. क्रिष्णा गजबे यांच्याकडे धाव घेऊन याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.साल्हेगावातील १० शेतकऱ्यांनी जय बुढापेन शेतकरी गटाची स्थापना केली. मानव विकास मिशन अंतर्गत या गटाला २०१३-१४ मध्ये कृषीविषय योजना मंजूर झाली. शेतकऱ्यांनी पाईप, विद्युत मोटार पंप व इतर साहित्य स्वत:च्या खर्चाने खरेदी केले. पाईपलाईनचे काम पूर्ण केले. नाल्यावरून पाण्याचा उपसा करण्यासाठी मोटार पंपास विद्युत जोडणी मिळावी म्हणून महावितरण कंपनीकडे ३१ जुलै २०१४ रोजी ७ हजार ७०० रूपयांचा भरणा केला. त्यानंतर विद्युत जोडणी मिळेल, अशी शेतकरी गटाला आशा होती. मात्र तब्बल आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्युत जोडणी मिळाली नाही. त्यानंतर गटातील शेतकऱ्यांनी महावितरणाच्या स्थानिक कार्यालयात जाणे सुरू केले. मात्र सदर कार्यालयाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात येत नव्हते. त्यानंतर कोरची येथे आढावा बैठकीला आ. क्रिष्णा गजबे आले असताना वीज विभागासंबंधी अनेक तक्रारी त्यांच्या निदर्शनास आल्या.साल्हे येथील जय बुढापेन शेतकरी गटाने आपली व्यथा आ. गजबे यांच्याकडे मांडली. आता किती कालावधीत वीज पुरवठा होतो, याची प्रतीक्षा या बचत गटाला लागलेली आहे. (तालुका प्रतिनिधी)
आठ महिने उलटूनही वीज जोडणी नाही
By admin | Updated: March 13, 2015 00:10 IST