वृद्धापकाळ योजनेचे अनुदान : पोळ्याच्या तोंडावर वृद्धांना मन:स्तापदेसाईगंज : गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात राज्य व केंद्र शासनाच्या विविध अनुदान योजना राबविल्या जातात. या योजनांचे अनुदान दरमहा बँकांमार्फत वितरित केले जाते. काही योजनांचे अनुदान तीन महिन्यांनंतर बँक खात्यात जमा होते. पोळा हा ग्रामीण भागात सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. या सणाच्या तोंडावर आपले अनुदान बँक खात्यात जमा झाले काय, हे पाहण्यासाठी जिल्हाभरात सहकारी बँकांच्या शाखांमध्ये शुक्रवारी वृद्ध नागरिकांची तुडूंब गर्दी उसळली होती. देसाईगंज येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा ज्येष्ठ नागरिक व वृद्ध लोकांनी भरून गेली होती. तहसील कार्यालयामार्फत वृद्ध तसेच परित्यक्ता महिलांना अनुदान देणाऱ्या विविध योजना राबविल्या जातात. या सर्व योजना आधारकार्डशी लिंक करून बँकेमार्फत राबविल्या जात आहेत. अनेक वृद्ध नागरिक दरमहा बँकेत पहिल्या आठवड्यात हजेरी लावून आपले अनुदान खात्यावर जमा झाले काय, याची शहानिशा करीत असतात. सप्टेंबर महिन्यात पोळा १२ तारखेला आला आहे. व शनिवार व रविवारी आता बँका बंद राहणार असल्याने शुक्रवारी जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५० शाखांमध्ये वृद्ध नागरिकांची तुडूंब गर्दी उसळली होती. त्यामुळे बँकेचा परिसर वृद्ध नागरिकांनी फुलून गेला होता. यामुळे अनेक नागरिकांना सकाळी १०.३० वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत बँकेतच ठाण मांडावे लागले. त्यामुळे त्यांना प्रचंड मन:स्ताप झाला. पोळ्याच्यापूर्वी आपल्याला पैसे मिळाले पाहिजे ही भावना प्रत्येक वृद्ध खातेदाराची दिसून आली. अनेकांना आपली स्लिप भरून घेण्यासाठी दुसऱ्यांची मदत घ्यावी लागली.
निराधारांनी बँक झाली फुल्ल
By admin | Updated: September 12, 2015 01:18 IST