प्रत्येकी २० हजार : अहेरी महसूल विभागातर्फे ४७ कुटुंबांना मदतअहेरी : घरातील कमावत्या व्यक्तीचे आकस्मिक निधन झाल्यानंतर महसूल विभागाच्या वतीने संबंधित कुटुंबाला २० हजार रूपयांची आर्थिक मदत कुटुंब लाभ योजनेंतर्गत दिली जाते. अहेरी तहसीलच्या वतीने तालुक्यातील ४७ कुटुुंबांना प्रत्येकी २० हजार रूपयांचे धनादेश असे एकूण ९ लाख ४० हजार रूपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली. तहसील कार्यालयात गुरूवारी आयोजित कार्यक्रमात तहसीलदार एस. आर. पुप्पलवार यांच्या हस्ते तालुक्यातील ४७ कुटुंबांना आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधील आकस्मिकरित्या मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, योजनेचे प्रमुख नायब तहसीलदार एन. एल. गुरनुले, लिपीक एच. जी. वलथरे उपस्थित होते. आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण ५७ लाभार्थ्यांनी या योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभासाठी अर्ज केला होता. यापैकी ४७ लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. उर्वरित १० लाभार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुट्या आढळल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. त्रुटींची पूर्तता केल्यानंतर त्यांना अर्थसहाय्य दिले जाईल, अशी माहिती यावेळी योजनेचे प्रमुख एन. एल. गुरनुले यांनी दिली. कुटुंबलाभ अर्थसहाय्य योजनेचा लाभ आरेंदा, येंकाबंडा, सुद्धागुड्डम, उमानूर, तलवाडा, छल्लेवाडा, जोगागुडा, करनेली, दिना, चेरपल्ली, व्यंकटरावपेठा, देवलमरी, अहेरी, आलापल्ली, वेलगूर, महागाव, येलचिल, गुडीगुडम, नवेगाव, भस्वापूर, नागेपल्ली, वांगेपल्ली आदी गावातील कुटुंबांना देण्यात आला. विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुप्पलवार यांनी केले.
नऊ लाखांचे धनादेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 01:45 IST