वन विभागातील अतुलनीय कामगिरीगडचिरोली/आलापल्ली : वनसेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वन संरक्षणाच्या प्रभावी कामासाठी तसेच उत्कृष्ट कार्याकरिता पदक देऊन सन्मानित करण्यात येते. वर्ष २०१३-१४ च्या अतुलनीय कामगिरीसाठी गडचिरोली जिल्ह्यातून ९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड महसूल व वन विभागाकडून करण्यात आली आहे. वन/वन्यजीव संरक्षण या कार्य प्रकाराकरिता गडचिरोली वनवृत्ताचे वनरक्षक रमेश किसन चव्हाण, तेजराम रामाजी अलोणे यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय शैलेश प्रल्हाद करोडकर, अतुल कवडूजी गांगरेड्डीवार, प्रांजय मनोहर वडेट्टीवार या तीन वनरक्षकांना रजतपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. वनपाल संवर्गात लाल मोहम्मद शेख यांना सुवर्ण तर लक्ष्मीकांत मोरेश्वर ठाकरे व सुरेश श्रीहरी येनगंटीवार यांना रजतपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. वन/वन्यजीव व्यवस्थापन या कार्यप्रकारामध्ये वनरक्षक श्रीनिवास रामू आडे यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे.राज्यभरात एकूण २६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना असे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती महसूल व वन विभागाचे सहसचिव (वने) डी. एल. थोरात यांनी २६ एप्रिल २०१६ रोजी काढलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. वन विभागाच्या वतीने अतुलनीय कामगिरी करणाऱ्या वनकर्मचारी, वनाधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असल्याने त्यांचे मनोबल वाढत आहे. (प्रतिनिधी)
नऊ कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुवर्ण व रजत पदक जाहीर
By admin | Updated: April 28, 2016 01:10 IST