जीर्ण इमारतींतूनच कारभार : लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्षगडचिरोली : महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी पुढाकार घेऊन गडचिरोली जिल्ह्यात तलाठी व मंडळ कार्यालयाच्या एकूण ४० नव्या इमारतींना मंजुरी प्रदान केली. निधी उपलब्ध झाल्यानंतर या इमारती बांधण्यात आल्या. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामूळे जिल्ह्यातील बहुतांश इमारती अद्यापही धूळ खात पडल्या आहेत. परिणामी दुसरीकडे जुन्या जीर्ण इमारतींतूनच महसूल विभागाचा कारभार चालविला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नव्या ४० तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त इमारतीसाठी तत्कालीन आघाडी शासनाने कोट्यावधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून या कार्यालयाच्या इमारतीचे काम गतीने करण्यात आले. मधल्या काळात निधी संपल्यामुळे काही महिने या इमारतींचे काम रखडले होते. मात्र काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी सदर बाब महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगितली. त्यांनी प्रयत्न करून राज्य शासनाकडून या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर जिल्ह्यात अनेक इमारती उभ्या राहिल्या. महसूल विभागाच्या कामकाजात गती यावी, तसेच तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयात येणाऱ्या शेतकरी व नागरिकांची पुरेशा जागेअभावी गैरसोय होऊ नये, या उद्देशाने तत्कालीन आघाडी सरकारने या इमारतीच्या बांधकामाला मंजुरी प्रदान केली. मात्र या इमारतीत महसूल विभागाचा प्रत्यक्ष कामकाज सुरू झाला नाही. परिणामी येथील मंडळ अधिकारी व तलाठ्यांना जुन्या जीर्ण इमारतीतूनच प्रशासकीय कामकाज चालवावे लागत आहे. प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण झालेल्या तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारतींमध्ये प्रत्यक्षात महसूल विभागाचा कारभार सुरू करावा, अशी मागणी राकाँचे पदाधिकारी मंदीप गोरडवार यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पावसाळ्यात धोक्याची शक्यतागडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या तलाठी व मंडळ कार्यालयाच्या इमारती जुन्या असून त्या जीर्ण झाल्या आहेत. अनेक इमारतीच्या भिंतींना तडा गेल्या आहेत. तर अनेक इमारतीच्या छतावरील कवेलूही फुटल्या आहेत. अशाच इमारतीत कार्यरत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना जमिनीचे महत्त्वपूर्ण दस्तावेज ठेवावे लागत आहे. पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाल्यास सदर कागदपत्रे पावसाने भिजून नष्ट होऊ शकतात. याशिवाय मंडळ अधिकारी व तलाठ्यांना जुन्या इमारतीत पुरेशा जागेअभावी बसण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. पावसाळ्यात जुन्या इमारतीमधून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मंडळ अधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारती धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 01:08 IST