चामोर्शी : विदर्भासह गडचिरोली जिल्हा तापू लागला आहे. सध्या जिल्ह्यात चाळीस अंश सेल्सियसच्या आसपास तापमान असल्याने तालुक्यातील नागरिक उष्णतेने कासावीस होत आहेत, तर मुक्या व भटक्या जनावरांचे चारा-पाण्याविना हाल होत आहेत. त्यामुळे मुक्या, भटक्या जनावरांसाठी पाणवठे बांधण्याची गरज निर्माण झाली आहे.
वातावरणातील तापमानात वाढ होत आहे. या उष्णतेत जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मुक्या, मोकाट जनावरांना मुबलक चारा व स्वच्छ पाणी मिळत नाही. विना चाऱ्यामुळे जनावरे अशक्त होतात, त्यांचा जीव कासावीस होतो, अशा जनावरांची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. माणसांकरिता पाणपोई लावण्यासाठी बऱ्याच संघटना पुढाकार घेतात. गावातील प्रत्येक चौकाचौकांत एक तरी पाणवठा बांधावा व त्यासाठी सामाजिक संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायतींनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविल्यास मुक्या प्राण्यांना तहान भागविता येईल. उन्हाळ्यात नदी, नाले, डबके, बोअरवेल यांचे पाणी आटते. त्यामुळे जनावरांनाही पाणी मिळत नाही. नाले, ओढ्यावरील घाण पाणी पिऊन पशु रोगग्रस्त होतात. त्यासाठी मुक्या, भटक्या पशु-पक्ष्यांसाठी पाणवठे बांधून त्यांची पाण्याची सोय करणे ही काळाची गरज आहे.
बाॅक्स
मिलच्या गेटजवळ पाण्याची साेय
चामोर्शी शहरातील हनुमान नगर येथील शारदा राईस मिलचे संचालक जयसुखलाल दोषी यांनी गेल्या काही वर्षांपासून आपल्या मिलच्या गेटजवळ भटकी जनावरे व पाळीव जनावरांसाठी पाणवठा बांधून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. या पाणवठ्याचा लाभ त्या मार्गांनी येणारे-जाणारे प्राणी घेत आहेत. त्यांचे अनुकरण सर्वांनी करण्याची गरज आहे.