दारूविक्री बंद करा : गोटूल, आश्रमशाळा व आंबेडकर चौकात लावले बॅनरझिंगानूर : बुधवारी सकाळच्या सुमारास झिंगानूर भागात नक्षली पत्रक व बॅनर लावल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री हे बॅनर लावण्यात आले असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे. वन विभागाच्या गेटवर कापडी बॅनर बांधला असून गोटूल व आश्रमशाळेच्या प्रवेशद्वारावर तसेच आंबेडकर चौकात कापडी बॅनर व पत्रके नक्षलवाद्यांनी लावलेले आहेत. वन विभागाकडून होणारे पाट्या, लठ्ठे कटाईचे काम बंद करा, वन व्यवस्थापन समिती रद्द करा, चौकीदार बंद करा, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. वन विभागाला माओवाद्यांनी या पत्रकातून कडक तंबी दिल्याचे दिसून येत आहे. अवैध दारूविक्री व गुडंबा विक्री बंद करा, रोजगार काम बंद करा, जंगल नष्ट होत आहे, असेही माओवाद्यांनी बॅनर नमूद केले आहे. सदर बॅनर भारत की कम्युनिस्ट पार्टी माओवादी सिरोंचा एरिया कमिटी असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकात दहशत पसरली असून एकाच वेळी झिंगानूर गावात एवढ्या मोठ्या संख्येने बॅनर लावण्यात आल्यामुळे नागरिकांमध्येही याविषयी मोठी चर्चा आहे. यासंदर्भात स्थानिक पोलिसांनीही दखल घेतली असल्याची माहिती आहे. (वार्ताहर)
झिंगानुरात नक्षली पत्रकातून वन विभागाला तंंबी
By admin | Updated: September 3, 2015 01:00 IST