लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : सन २०२० - २०२१ या शैक्षणिक सत्रात नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य व उत्स्फूर्त मार्गदर्शन शिक्षकांकडून मिळावे व त्यात विद्यार्थी यशस्वी व्हावेत, या हेतूने शिक्षण विभाग पंचायत समिती, देसाईगंज अंतर्गत शिक्षकांना उद्बोधन वर्गातून मार्गदर्शन करण्यात आले. या उद्बोधन वर्गात चंद्रपूर येथील ‘झटपट गणित’ पुस्तकाचे लेखक तथा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बालाजी बावणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गटसमन्वयक विजय बन्सोड, आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सुलभा प्रधान, केंद्रप्रमुख ब्रह्मानंद उईके उपस्थित होते. नवोदय किंवा शिष्यवृत्तीसारख्या जीवनातील स्पर्धात्मक परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त असल्याने या उद्बोधन वर्गात प्राप्त केलेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना पुरेपूर लाभ द्यावा, असे आवाहन विजय बन्सोड यांनी प्रास्ताविकातून केले. या उद्बोधन वर्गाचे सूत्रसंचालन विषय साधन व्यक्ती होमा शहारे यांनी केले. रानू ठाकूर यांनी आभार मानले. या वर्गाच्या यशस्वीतेसाठी आर. जी. म्हस्के यांच्यासह गटसाधन केंद्राच्या अलका सोनेकर, वैशाली खोब्रागडे व रणजित चौधरी यांनी सहकार्य केले. उद्बोधन वर्गाला जिल्हा परिषद, नगरपरिषद व खासगी शाळांचे ५९ शिक्षक उपस्थित होते.