जलयुक्त शिवार अभियान : १३ हजार घनमीटर गाळ उपसला गडचिरोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून तलाव व बोड्यांच्या दुरूस्तीचे काम तसेच गाळ उपसण्याचे काम केले जात आहे. मागील वर्षी १०० पेक्षा अधिक तलावांमधील १२ हजार ६०० घनमीटर गाळ लोकसहभागातून उपसण्यात आला. त्यामुळे या तलावांची पाणी साठवण क्षमता वाढण्यास फार मोठी मदत झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. धान पिकाला रोवणीपासून ते कापणीपर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ५०० पेक्षा अधिक मामा तलाव व बोड्या आहेत. काही बोड्या ३० ते ४० वर्षांपूर्वीच्या आहेत. या बोड्यांमध्ये दरवर्षी पावसाच्या पाण्याबरोबर गाळ साचल्याने या बोड्या उथळ झाल्या होत्या. परिणामी पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. बोड्या पावसाच्या पाण्याने लवकरच भरत होत्या. पाणी सोडल्यानंतर लवकरच आटतही होत्या. परिणामी शेवटपर्यंत पाणी पुरत नव्हते. त्यामुळे एका पाण्याने धानपीक करपत होते. २०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानासाठी १५२ गावांची निवड करण्यात आली व यामध्ये प्राधान्याने तलाव व बोड्यांच्या दुरूस्तीच्या कामाला प्राधान्य देण्यात आले. सरकारी कामाबरोबरच लोकसहभागातून तलाव व बोड्यांची दुरूस्ती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. गाळ उपसण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी स्वत:हून गाळ उपसण्यास सुरूवात केली. जिल्हाभरातील १०० हून अधिक तलाव व बोड्यांमधील १२ हजार ६०० घनमीटर गाळ उपसण्यात आला आहे. याचा फायदा यावर्षीच दिसून आला असून तलाव व बोड्यांमधील पाणी साठवण क्षमता वाढली आहे. ८४४ शेततळे बांधले सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये पाऊस न झाल्यास सिंचनाअभावी धानाचे पीक करपण्याचा सर्वाधिक धोका राहतो. या कालावधीत शेतकऱ्यांकडे थोडीफार सिंचनाची सुविधा असल्यास त्याचे धानपीक वाचू शकते. त्यामुळे धान पिकाच्या शेतीत शेततळ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना शेततळे बांधून देण्याची योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत जिल्हयात ८४४ शेततळे बांधण्यात आली आहेत. पहिल्यांदाच उपसला गाळ अनेक तलाव व बोड्या स्वातंत्र्यपूर्व कालावधीतील आहेत. तर काही तलावांना ३० ते ४० वर्षांचा कालावधी झाला आहे. गाळ उपसण्यासाठी बराच खर्च येत असल्याने एवढ्या वर्षानंतरही गाळ उपसण्यात आला नव्हता. काही बोड्यांच्या पाळी फुटल्याने या दुरूस्तही करण्यात आल्या नव्हत्या. मात्र जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पहिल्यांदाच गाळ उपसण्यात आला आहे. शासकीय पैशाबरोबरच लोकांच्या सहभागातून हे महत्वपुर्ण काम घडले आहे. लोकसहभागातून अशा प्रकारची लोकोपयोगी कामे झाल्यास ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही. ग्रामीण भागातील नागरिक लोकसहभागासाठी सहज तयार होतात. केवळ त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
लोकसहभागातून तलावांना नवसंजीवनी
By admin | Updated: August 10, 2016 01:34 IST