गडचिरोली : पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडी सरकारने २५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. गडचिरोली जिल्ह्यात १० नगर पंचायती निर्माण करण्यात येणार होत्या. मात्र याबाबतचा निर्णय शासनस्तरावरून न झाल्याने नगर पंचायतीचे काम आता थंडबस्त्यात पडले आहे. राज्य सरकारने २५ हजार ते ४८ हजार लोकसंख्या असलेल्या गावात नगर पंचायती स्थापण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यांपैकी गडचिरोली व देसाईगंज येथे नगर पालिका आहेत. त्यामुळे १० तालुका मुख्यालयात नगर पंचायतीची स्थापना करण्यात येणार होती. यामध्ये कोरची, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, चामोर्शी, अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायती नगर पंचायतीचा दर्जा देण्यात येणार होता. याबाबत शासन आदेशानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने हरकतीसुध्दा नागरिकांकडून मागविले होते. अनेकांनी आरमोरी व चामोर्शी ग्रामपंचायतीला नगर पालिकेचाच दर्जा द्यावा, अशी मागणीही केली होती. मात्र राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर हा मुद्दा आता थंडबस्त्यात पडला आहे. शासनाकडून या निर्णयानंतर चंद्रपूर जिल्ह्यात गडचांदूर, नागपूर जिल्ह्यात कन्हान, वाडी या ग्रामपंचायती भागांना नगर पालिकांचा दर्जा देऊन तेथे नव्याने निवडणुकाही घेण्यात आल्या आहे. गडचिरोली जिल्ह्यात मे महिन्यात २९९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. त्यापूर्वी शासनाने नगर पंचायत निर्मितीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब न केल्यास तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना नंतर दर्जा देण्यास अडचणी निर्माण होणार आहे. नगर पंचायत झाल्यास या भागाच्या तालुका मुख्यालयाच्या विकासाला चालना मिळेल, अशी या निर्णयामागची भावना होती. मात्र शासनाने हा निर्णय थंडबस्त्यात ठेवला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यात नगर पंचायती रखडल्या
By admin | Updated: February 5, 2015 23:09 IST