गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात १० तालुका मुख्यालयाच्या गावांना नगर पंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेतला होता. या निर्णयानुसार जिल्ह्यात नव्या दहा नगर पंचायती निर्माण करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीला एक जिल्हा परिषद सदस्य व पाच पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. या सर्वांनी आमचा पूर्ण कार्यकाळ झाल्यावर नगर पंचायती स्थापन करण्याची प्रक्रिया राबवा, अशी सूचना प्रशासनाला केली. या सुनावणीला जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासनाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सुनावणीसाठी आरमोरी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार तसेच आरमोरी पं. स. गणाचे सदस्य चंदू वडपल्लीवार, अशोक वाकडे, चामोर्शीचे पं. स. सदस्य वैभव भिवापुरे यांच्यासह अहेरी व एटापल्ली येथील पं. स. सदस्य उपस्थित होते. या सर्वांनी आपले म्हणणे प्रशासनासमोर मांडले आहे. यांचे म्हणणे ऐकल्यानंतर आता प्रशासन नगर पंचायती स्थापनेबाबत आपली पुढील कार्यवाही करेल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. जिल्ह्यात १० नगर पंचायती स्थापन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर प्रक्रिया किती दिवसात पार पडते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यातील काही ग्राम पंचायतीच्या निवडणुकाही सध्या तोंडावर आल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
कार्यकाळ संपल्यावर करा नगर पंचायती
By admin | Updated: April 9, 2015 01:30 IST