गडचिरोली : चाकूने वार करून गावातीलच इसमाची हत्या करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने आज गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा व १ हजार रूपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव अशोक अंकलु जनगम (२३) रा. व्यंकटापूर (बामणी) तालुका सिरोंचा असे आहे. प्राप्त माहितीनुसार सडवली दुर्गय्या आत्राम (३०) हा इसम आपल्या कुटुंबियांसोबत बामणी येथे राहत होता. सदर इसम गावचा पोलीस पाटीलही होता. याचे तीन ते चार वर्षापूवी अशोक जनगाम याचेशी किरकोळ भांडण होऊन मारहाणीची घटना घडली होती. तेव्हापासून अशोक जनगाम हा इसम पोलीस पाटील सडवली अलाम यांचा राग धरून होता. २१ डिसेंबर २०१२ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास पोलीस पाटील सडवली अलाम हा शामराव करपते यांच्या घराजवळ खाली पडल्याच्या अवस्थेत दिसून आल्याचे फिर्यादी मृतक पोलीस पाटलाचे वडील दुर्गय्या अलाम यांनी तक्रारी म्हटले आहे. यावेळी अशोक जनगाम हा पळून जातांनाही दिसल्याचेही फिर्यादीने तक्रारीत नमुद केले होते. त्यानंतर फिर्यादीने घटनास्थळावर जाऊन पाहीले असता पोलीस पाटील सडवली अलाम याच्या पोटावर चाकूचे वार केले असल्याचे तसेच त्याचा गळा चिरून असल्याचे दिसून आल्याचे तक्रारी फिर्यादीने म्हटले आहे. यावेळी पोलीस पाटील सडवली अलाम हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दरम्यान गावातील नागरिक यावेळी लक्ष्मण सडमेक, चंद्रम चंद्रय्या, पोचम अलाम घटनास्थळी आले. व्यंकटरापूरचे सरपंच समय्या नैताम हेही घटनास्थळी दाखल झाले. सरपंचानी या घटनेची माहिती व्यंकटापूर पोलीस ठाण्याला दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पोलीस पाटील सडवली अलाम याला बामणीच्या दवाखान्यात नेले त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. जुन्या भांडणातून अशोक जनगाम याने आपला मुलगा सडवली अलाम याची धारदार चाकूने वार करून हत्या केल्याची तक्रार मृतकाचे वडील फिर्यादी दुर्गय्या रामसाय अलाम यांनी बामणी पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणाचा तपास करून बामणी पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक डी. आर. फराटे यांनी आरोपी अशोक जनगाम याच्या विरोधात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला व सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणात अशोक जनगाम याच्यासह चार आरोपी सहभागी होते. मात्र पुराव्याअभावी तीन आरोपींची निर्दाेष सुटका झाली. यामध्ये बानय्या अंकलू जनगाम (२९), सुनिल लक्ष्मण मांदाळे (२४) दोघेही रा. व्यंकटापूर, श्रीनिवास चनय्या लंगारी (२७) रा. जंगलपल्ली यांचा समावेश होता. या हत्या प्रकरणावर आज गुरूवारी गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. आर. सिरासाव यांनी आरोपी अशोक जनगाम याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून एस. सी. मुनघाटे यांनी काम पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)
खुनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा
By admin | Updated: October 16, 2014 23:23 IST