पावसाळ्यापूर्वीची खबरदारी : तलावाच्या मुख्य सांडव्याच्या परिसरात कारवाईगडचिरोली : प्रचंड पर्जन्यमानाने पावसाळ्यात गोकुलनगरलगतच्या शहरातील एकमेव तलावात मोठा पाणी साठा जमा होतो. या तलावातील अतिरिक्त पाणी मुख्य सांडव्यातून सुरळीतपणे शहराबाहेर जावे, जेणे करून पावसाळ्यात लगतच्या घरांमध्ये पाणी शिरणार नाही, या दृष्टीने गडचिरोली नगर पालिका प्रशासनाने गुरूवारी पोलीस संरक्षणात जेसीबीच्या सहाय्याने गोकुलनगर परिसरातील अतिक्रमण काढले.स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार पावसाळ्यात शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांनी सूचविल्या आहेत. गोकुलनगर तलावाच्या मुख्य सांडव्याच्या तोंडावर तसेच परिसरात अनेक नागरिकांनी सिमेंटचे खांब उभारून तारेचे कुंपन करून अतिक्रमण केले होते तर काहींनी तणीस तसेच इंधनासाठी जळाऊ लाकडेही अतिक्रमित जागेवर ठेवली होती. तलावाच्या मुख्य सांडव्याच्या परिसरात अतिक्रमण झाल्याने पावसाळ्यात तलावातील अतिरिक्त पाणी शहराबाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला होता. या समस्येची दखल घेऊन गडचिरोली पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी या भागातील अतिक्रमण काढण्याचे सक्त निर्देश पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला दिले. त्यानुसार पालिकेचे अभियंता एस. ए. पुनवटकर, शाखा अभियंता जी. टी. मैंद तसेच आरोग्य निरीक्षक डी. डी. संतोषवार यांनी पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने तलावाच्या सांडव्याच्या परिसरातील अतिक्रमण काढले.या परिसरात जेसीबीने नाली खोदून सांडव्याद्वारे पावसाळ्यात तलावातील अतिरिक्त पाणी जाण्यासाठीचा मार्ग मोकळा केला. यामुळे पावसाळ्यात आपत्ती निर्माण होणार नाही. (स्थानिक प्रतिनिधी)
पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटविले
By admin | Updated: June 10, 2016 01:27 IST