भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या व सर्वाधिक समस्या असलेल्या भामरागड तालुक्यातील प्रश्नांचा आढावा खासदार अशोक नेते यांनी रविवारी घेतला. स्थानिक विश्रामगृहात आयोजित बैठकीत दाखल होण्यापूर्वी खासदार नेते यांनी गावातील लोकांच्या समस्यांचे निवेदन स्वीकारले व या समस्या निकाली काढण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तर बऱ्याच नागरिकांनी आपल्या समस्या प्रत्यक्ष उभ्या राहून खासदारांसमोर मांडल्या. अनेक गावात हातपंप विद्युत पुरवठा बंद असल्याने बंद आहे. बोरिया गावची शाळा नेहमीच बंद राहत असल्याचे बोरिया गावातील एका नागरिकाने सांगितले. अनेक नागरिकांनी घरकुलाची मागणी खासदारांकडे केली. या सर्व समस्यांचे निराकरण तातडीने करा, असे निर्देश खासदारांनी दिले.खासदारांच्या आढावा बैठकीला बरेच अधिकारी गैरहजर होते. अधिकारी हजर नसल्याने तालुक्यातील दुष्काळी गावांची माहिती खासदारांना मिळाली नाही. तसेच वनहक्क जमिनी संदर्भातील प्रश्नांवर ज्या नागरिकांनी खासदारांना निवेदन दिले होते, त्यांच्याही प्रश्नांची सोडवणूक होऊ शकली नाही. पुढील आढावा बैठकीला सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे निर्देश खासदारांनी दिले. (तालुका प्रतिनिधी)पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वाचला विकासाचा पाढा४भाजप तालुका शाखेच्या वतीने कार्यकर्त्यांची सभा खासदार अशोक नेते यांच्या उपस्थित घेण्यात आली. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मजबुतीसाठी लक्ष द्यावे, केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब लोकांच्या विकासावर लक्ष केंद्रीत करून आहेत, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या अनेक योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी झटावे, असे आवाहन त्यांनी केले. भामरागड येथूनही राष्ट्रीय महामार्ग छत्तीसगड राज्यापर्यंत मंजूर झाला आहे, अशी माहिती त्यांनी या बैठकीत दिली. या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिश्वास, डॉ. भारत खटी, दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष डी. के. मेश्राम, जिल्हा सचिव विनोद अकनपल्लीवार, अहेरीचे तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, दिलीप उईके, भाजप तालुकाध्यक्ष संतोष सिडाम, जोगा उसेंडी आदी उपस्थित होते.
खासदारांनी घेतला भामरागडच्या समस्येचा आढावा
By admin | Updated: April 12, 2016 03:59 IST