अहेरी पोलिसांची कारवाई : ३७ जणांना केली अटकअहेरी : दंडाधिकाऱ्यांची परवानगी न घेता तहसील कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या कन्नेपल्ली येथील ३७ नागरिकांना अहेरी पोलिसांनी अटक करून त्यांचे सुरू असलेले आंदोलन दडपून टाकले. सायंकाळी उशिरा या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.तालुक्यातील कन्नेपल्ली येथील स्वस्त धान्य दुकानात २००८-०९ मध्ये दुकानदाराने घोटाळा केल्याचा आरोप करून प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने २६ जानेवारीला ग्रामसभेचा ठराव घेऊन दुकानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारपासून ३० महिला व पुरूषांनी तहसील कार्यालयासमोर अहेरी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र या उपोषणाला तहसीलदार तथा न्याय दंडाधिकारी यांच्याकडून परवानगी घेण्यात आली नसल्यामुळे तसेच कलम ३७ अन्वये जमाव बंदी सुरू असल्याने तहसीलदारांनी अहेरी पोलिसांना आदेश देऊन उपोषणाला बसलेल्या नागरिकांना अटक करण्यास सांगितले. अहेरी तहसीलदारांच्या आदेशानंतर अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी उपोषणस्थळी ताफ्यासह जाऊन ३७ नागरिकांना अटक केली. यामध्ये १२ महिला व २५ पुरूषांचा समावेश आहे. या सर्वांना सायंकाळी जामिनावर सोडून देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
कन्नेपल्लीवासीयांचे आंदोलन गुंडाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2016 01:16 IST