गडचिरोली : ग्रामसेवक सुधीर वसाके यांच्या आत्महत्या प्रकरणास जबाबदार असणाऱ्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांसह पंचायत विस्तार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तसेच या प्रकरणाची विभागीय चौकशी होईपर्यंत ग्रामसेवक संघटनेमार्फत ग्रामसेवकांचे आंदोलन सुरूच राहणार, असा निर्णय सोमवारी धानोरा मार्गावरील ग्रामसेवक भवनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जि. प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामसेवक संघटनेचे राज्यध्यक्ष ढाकणे, राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, राज्य कोषाध्यक्ष बापू अहिरे, सचिव अनिल कोहळे, अमरावतीचे विभागीय उपाध्यक्ष बबनराव कोल्हे, नागपूर विभागाचे सचिन वारकर, ग्रामसेवक संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, सरचिटणीस प्रदीप भांडेकर, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे आदी उपस्थित होते. या बैठकीत कोरची तालुक्यातील बिहिटेकला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुधीर वसाके यांच्या आत्महत्या प्र्रकरणाबाबत चर्चा करण्यात आली. या प्रकरणातील दोषी संवर्ग विकास अधिकारी डी. एम. वैरागडे, पंचायत विस्तार अधिकारी ए. बी. ठाकरे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. या बैठकीत ग्रामसेवकांच्या विविध समस्या व मागण्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, संचालन संजीव बोरकर यांनी केले तर आभार प्रदीप भांडेकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी वसंत पवार, श्रीकृष्ण मंगर, जयंत मेश्राम यांनी सहकार्य केले.
ग्रामसेवकांचे आंदोलन तीव्र होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 03:52 IST