निवेदन : कोरची पंचायत समितीतील प्रकरणगडचिरोली : पंचायत समिती कोरची अंतर्गत कार्यरत असलेल्या किशोर हिचामी या परिचरावर संगणक चोरीचा आरोप लावून पोलिसांमध्ये तक्रार करणाऱ्या विस्तार अधिकारी (सांख्यिकी) गणवीर यांच्यावर कारवाई करावी. या मागणीसाठी परिचरांनी गुरूवारी सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलन केले. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांना निवेदन सादर केले.किशोर हिचामी हे रात्रीच्या सुमारास चौकीदाराचे काम करीत होते. मात्र गणवीर यांनी त्यांच्यावर संगणक चोरीचा आरोप लावला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर बीडीओंची परवानगी न घेताच पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी त्याला भर चौकातून उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेऊन मारहाण केली. यामुळे हिचामी यांच्यावर झालेला हा अन्याय असून त्यांना निलंबित करावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे विभागीय सहसचिव कैलास भोयर, जिल्हा उपाध्यक्ष मंगला फरकडे, राजेंद्र रेचनकर व कर्मचारी उपस्थित होते.
गणवीरांवर कारवाईसाठी आंदोलन
By admin | Updated: October 9, 2015 01:59 IST