शुभवर्तमान : दुर्गम भागापर्यंत पोहोचले नेटवर्कभामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या मात्र महाराष्ट्र शासनाचे सोयीसुविधा पुरविण्यात कायम दुर्लक्ष राहिलेल्या भामरागड तालुक्याच्या दृष्टीने दिवाळीच्या तोंडावर गोड बातमी या भागातील आदिवासी बांधवांना मिळाली आहे.तालुका मुख्यालयापासून २२ किमी अंतरावर असलेल्या दुर्गम भागातील कोठी येथे केंद्र शासनाच्या मदतीने भारत संचार निगमच्या वतीने मोबाईल सेवा सुरू झाली आहे. कोठी हे भामरागड तालुक्यातील संवेदनशील व दुर्गम गाव आहे. येथे पोलीस ठाणे, आरोग्य केंद्र, आश्रमशाळा आहे. या भागात दळणवळणाचे तसेच दूरसंचार साधने अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. कोठी गावात दिवाळीच्या पहिले मोबाईल टॉवर सुरू झाल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड आनंद आहे. नवीन मोबाईल संच घेण्यासाठी अनेकांची आता लगबग सुरू झाली आहे. बऱ्याच वर्षानंतर हा भाग दूरसंचार सेवेने जोडल्या गेला. आमच्यासाठी अच्छे दिन आल्याची भावना या भागातील युवकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.प्रशासनालाही कोठी भागात टॉवर झाल्यामुळे आता संपर्क साधण्याच्या दृष्टीने सोय होणार आहे. भामरागड तालुक्यात आणखी तीन गावात नव्याने टॉवर उभारणीचे काम करण्यात येत असून या तालुक्याला संपूर्ण मोबाईल सेवेचा लाभ त्यामुळे उपलब्ध होईल, असे चिन्ह आहे. या भागात भ्रमणध्वनी सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोठी गावात सुरू झाली मोबाईल सेवा
By admin | Updated: November 8, 2015 01:34 IST