लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर/राजाराम : उपपोलीस स्टेशन राजाराम खांदलाच्या वतीने मंगळवारी गावातून नक्षलविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो विद्यार्थ्यांसह गावातील नागरिक सहभागी झाले. ‘नो लाल सलाम- फक्त जयसेवा’, ‘आदिवासी बचाओ-नक्षल भगाओ’ आदी घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.माओवाद्यांच्या वतीने २८ जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत नक्षल शहीद सप्ताह पाळला जात आहे. त्या अनुषंगाने उपपोलीस स्टेशन राजाराम खांदलाच्या वतीने मंगळवारी गावातून नक्षलविरोधी शांतता रॅली काढण्यात आली. या शांतता रॅलीत अनुदानित प्राथमिक तथा माध्यमिक आश्रमशाळेचे विद्यार्थी, शिक्षक, गावातील नागरिक, उपपोलीस स्टेशनमधील कर्मचारी सहभागी झाले.पोलीस ठाण्यातून रॅली काढून गावातील मुख्य रस्त्याने फिरविण्यात आली. या रॅलीत ‘नो लाल सलाम- फक्त जयसेवा’, ‘आदिवासी बचाओ-नक्षल भगाओ’ आदी नक्षलविरोधी घोषणा देण्यात आल्या. रॅलीनंतर सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीटांचे वितरण करण्यात आले. तसेच उपपोलीस ठाण्यात समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भोरे, विजय कोल्हे तसेच कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.नागरिकांनी नक्षल्यांच्या भूलथापांना बळी न पडता पोलिसांना सहकार्य करावे तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात राहून आपला व कुटुंबाचा विकास साधावा, असे आवाहन करण्यात आले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी उपपोलीस स्टेशनमधील कर्मचारी व नागरिकांनी सहकार्य केले.
‘आदिवासी बचाओ-नक्षल भगाओ’चा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:07 IST
उपपोलीस स्टेशन राजाराम खांदलाच्या वतीने मंगळवारी गावातून नक्षलविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो विद्यार्थ्यांसह गावातील नागरिक सहभागी झाले.
‘आदिवासी बचाओ-नक्षल भगाओ’चा संदेश
ठळक मुद्देराजाराम येथे शांतता रॅली : विद्यार्थ्यांसह नागरिक सहभागी