मौशीखांब येथे तीन दिवस मोठी यात्रा : अश्वासह दशाननपुत्राची करतात पूजागोपाल लाजूरकर गडचिरोलीविदर्भातील एकमेव मेघनाद मंदिर गडचिरोली जिल्ह्यातील मौशीखांब गावात आहे. येथे मेघनाद यात्रा दरवर्षी भरविली जाते. मात्र बऱ्याच कालावधीनंतर यंदा ही यात्रा सलग दोन वर्षात उत्सवरुपाने साजरी केली जाणार आहे. ३१ डिसेंबर २०१५ ला यात्रेला प्रारंभ होणार असून २ जानेवारी २०१६ पर्यंत ही यात्रा चालणार आहे. हा एक दुर्मिळ योगायोग यंदा घडून आला आहे. गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब येथील मेघनादांचे मंदिर फार पुरातन आहे. मंदिराचे स्वरूप पालटले असले तरी विदर्भातील एकमेव मेघनादांचे मंदिर म्हणून गणले जाते. श्री दत्त जयंतीनंतर दरवर्षी मौशीखांब येथे मेघनादांची तीन दिवशीय यात्रा भरविली जाते. सदर यात्रा जिल्ह्यातील मार्र्कंडानंतर सर्वात मोठी यात्रा आहे. असे असतानाही शासनाच्या उदासीनतेमुळे मेघनाद देवस्थान दुर्लक्षित आहे. भक्तिभाव असला म्हणजे, दैत्य वा देव याची पारख भाविकाला राहत नाही. मौशीखांब येथे रावणपुत्र मेघनाद यांची भक्तिभावाने पूजा गावकरी गावनिर्मितीच्या काळापासूनच पिढ्यान्पिढ्या करीत आले आहेत. मेघनाद दैत्य वा देव याची किंचीतही साशंक भावना त्यांच्या मनात आली नाही. वर्षानुवर्षे भक्तिभावाचा वसा आजतागायत गावकऱ्यांनी जोपासला आहे. प्रारंभी मेघनाद देवाचे मंदिर एका झोपडीत होते. कालानुरूप या मंदिराचे स्वरूप बदलले. १९८५-८६ या वर्षात लोकवर्गणीतून मंदिराचे नवनिर्माण करण्यात आले. घोड्यावर स्वार असलेले मेघनाद आज मंदिरात स्थित आहेत. शिवाय मंदिरात छोटे-मोठे मातीचे घोडेही आहेत. दरवर्षी भाविक मेघनादांच्या नावाची उपासना करतात. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर अनेक भाविक मंदिराला घोडा दान देतात. मेघनादांचे मूळ स्थान आरमोरी तालुक्यातील वासाळा येथे आहे, असा समज गावकऱ्यांचा आहे. मात्र मौशीखांब येथेच मंदिर असल्याने भाविकांची अपार श्रध्दा मेघनादांवर आहे. गावातील सुख, शांती अबाधित राहावी यासाठी एक वर्षाआड सागवानाचे खांब गाडले जाते. क्षतिग्रस्त घोड्यांच्या मूर्त्या नदीत प्रवाहित केल्या जातात. दरवर्षी नवीन घोड्यांच्या मूर्त्या देवस्थानाला भाविक दान स्वरूपात देतात. मौशीखांब येथील मेघनादांचे मंदिर विदर्भातील एकमेव मंदिर आहे. मात्र सदर मंदिर शासनाच्या दुर्लक्षामुळे विकासापासून वंचित आहे. कदाचित सदर मंदिर महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असल्याबाबत तीळमात्र शंका भाविकांच्या मनात नाही. गुरुवारपासून तीन दिवशीय यात्रेला सुरुवात होणार असून भाविकांची गर्दी उसळणार आहे.
दोन वर्षात प्रथमच साजरी होणार मेघनाद यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 01:38 IST