गडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेच्या नगराध्यक्ष निर्मला दीपक मडके यांनी आपल्या पदाचा सव्वा वर्षानंतर राजीनामा देण्याची पूर्ण तयारी केली आहे. युवाशक्ती आघाडीच्या स्थानिकस्तरावरील नेत्यांशी झालेल्या संवादानुसार आपण काम करणार असून भविष्यातही या नेत्यांसोबतच राजकारण करणार असल्याचे नगराध्यक्ष निर्मला मडके यांचे यजमान दीपक मडके यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. गडचिरोली नगर पालिकेचे नगराध्यक्ष पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या पदासाठी राखीव होते. युवाशक्ती आघाडीने अडीच वर्षाच्या कार्यकाळाचे दोन भाग करून सव्वा-सव्वा वर्षासाठी दोन नाव नगराध्यक्ष पदाकरिता निश्चित केले होते. त्यानुसार पहिल्यांदा निर्मला मडके यांना संधी मिळाली. मडके यांना नगराध्यक्ष करताना युवाशक्ती आघाडीचे सर्वासर्वे प्रा. राजेश कात्रटवार, प्रा. रमेश चौधरी, आनंद श्रुंगारपवार यांच्याशी त्यावेळी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला होता. मडके यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होताच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे व त्या राजीनामा सादर करतील, अशी माहिती दीपक मडके यांनी दिली आहे.निर्मला मडके यांच्या काळात ९ कोटी रूपये विकास कामासाठी मंजूर झाले. त्याच्या निविदा लवकरच निघतील, अशी माहितीही त्यांनी दिली. भविष्यातही विद्यमान नेतृत्वासोबतच आपण एकनिष्ठ राहणार असल्याचे दीपक मडके यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
नगराध्यक्षांचा सव्वा वर्षातच राजीनामा?
By admin | Updated: September 2, 2015 01:21 IST