काेरची : तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या मलायाट गावात अजूनही भाैतिक साेईसुविधा पाेहाेचल्या नाहीत. गाेंदिया, गडचिराेली जिल्ह्याच्या सीमेवर हे गाव वसले आहे. या ठिकाणी चवथीपर्यंत शाळा आहे. हे गाव जंगलाने वेढले आहे.
कुटीर उद्याेग पूर्वपदावर
गडचिराेली : जिल्ह्यात शेतीवर आधारित अनेक कुटीर उद्याेग आहेत. लाॅकडाऊनच्या कालावधीत हे सर्व उद्याेग बंद पडले हाेते. अनलाॅकची प्रक्रिया राबविल्यानंतर, आता हे कुटीर उद्याेग पुन्हा सुरू झाले आहेत. या कुटीर उद्याेगांची उलाढाल वाढली आहे. त्यामुळे राेजगार निर्मिती हाेत आहे.
बॉयोमेट्रिक मशीन बंद, कर्मचारी बिनधास्त
आलापल्ली : अहेरी तालुका मुख्यालयातील शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बॉयोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत.
औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात
धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना उद्योग टाकण्यास अडचणी येत आहेत.
ट्रॅक्टर चालकांसाठी परवाना शिबिराची गरज
एटापल्ली : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूकविषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. पाच वर्षांत अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरधारकांसाठी शिबिराची गरज आहे.
खासगी स्पर्धक गरजेचे
धानाेरा : तालुक्यात खासगी कंपन्यांचे माेबाइल टाॅवर नाहीच्या बराेबर आहेत. त्यामुळे बीएसएनएलची एकाधिकारशाही आहे. ९० टक्के ग्राहक बीएसएनएलचे आहेत. मात्र, बीएसएनएलने सेवेत सुधारणा केली नसल्याने ग्राहक कमालीचे त्रस्त आहेत. काही ठिकाणी टाॅवर आहेत. मात्र, ते काम करीत नाहीत.
नाल्या तुंबल्या
सिराेंचा : नगरपंचायतीच्या वतीने शहरातील नाल्यांचा नियमितपणे उपसा केला जात नाही. त्यामुळे अनेक नाल्या तुंबल्या आहेत. काही नाल्या तर वर्षातून एकदाच पावसाळ्यापूर्वी उपसल्या जातात. ही अतिशय गंभीर बाब आहे. नगरपंचायत स्वच्छतेसाठी आग्रह धरत असताना, स्वत:च स्वच्छतेकडे दुर्लक्ष करते.
वाहतुकीची काेंडी
गडचिराेली : चामाेर्शी राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. त्यामुळे शहरातून एकतर्फी वाहतूक करण्यात आली आहे. दाेन माेठमाेठी वाहने समाेरासमाेर आल्यानंतर वाहतुकीची काेंडी माेठ्या प्रमाणात हाेते. दुसऱ्या बाजूचे काम सुरू करण्याची मागणी हाेत आहे.
९० टक्के पथदिवे बंद
गडचिराेली : आरमाेरी मार्गावर कठाणी नदीपर्यंत पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र, यातील ९० टक्के पथदिवे बंद आहेत. या मार्गावर रात्री व पहाटेला शेकडाे नागरिक फिरण्यासाठी जातात. त्यामुळे नगरपरिषदेने या मार्गावर पथदिवे लावले आहेत. मात्र, यातील ९० टक्के पथदिवे सद्य:स्थितीत बंद पडून आहेत.
बाजारातील गाळे द्या
गडचिराेली : शहरातील आठवडी बाजारातील गाळ्यांचे काम पूर्ण झाले आहे. हे गाळे दुकानदारांना दुकान टाकण्यासाठी किरायाने उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे. या दुकान गाळ्यांच्या माध्यमातून अनेक युवकांना राेजगारासाठी स्थायी स्वरूपाची जागा उपलब्ध हाेण्यास मदत हाेणार आहे.
मिरकलात वीज नाही
अहेरी : तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या मिरकल गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेंतर्गतही या गावाला रस्ता बांधून देण्यात आला नाही. त्यामुळे जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने हे गाव गाठावे लागते. विजेचे खांब लावले. मात्र, वीज पाेहाेचली नाही.
तुडतुड्याचे सर्वेक्षण करा
मानापूर/देलनवाडी : परिसरातील धानपिकावर माेठ्या प्रमाणात मावा व तुडतुडा राेगाची लागण झाली आहे. त्यामुळे निसवलेले धान करपत चालले आहे. अनेकदा फवारणी करूनही राेग आटाेक्यात येत नसल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी आहे.
गतिरोधकाची गरज
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने गोगाव येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी गतिराेधकाचे बांधकाम करावे, अशी मागणी आहे.