राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज व ग्रामगीताचार्य तुकारामदादा यांच्या विचारांनी प्रेरित हाेऊन दुधराम दखणे हे गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य झाले. त्यांनी स्वत:चे जीवन राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी वाहून घेतले. त्यानुसार अनावश्यक रूढी, परंपरा, अंधश्रध्दांच्या ते विराेधात हाेते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर तेरवीच्या कार्यक्रमावर खर्च करणे त्यांचे पुत्र रूपचंद दखणे यांना सयुक्तिक वाटले नाही. तेरवीच्या कार्यक्रमावर खर्च करण्याऐवजी तेवढ्याच पैशातून त्यांनी माेटारपंप खरेदी केला. हा माेटारपंप सार्वजनिक विहिरीवर बसविला. माेटारपंपामुळे विहिरीतून पाणी काढण्याचा त्रास वाचणार आहे. त्यांच्या या मानवतेच्या उपक्रमाची नागरिकांनी प्रशंसा केली.
माेटारपंपाचे लाेकार्पण करतेवेळी श्री गुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडीचे प्रमुख नामदेव ठाकूर, सार्वभाैम ग्रामसभा समन्वय समितीचे संघटक प्रा. मिलिंद सुपले, सहसंघटक भगवान प्रधान, सहसचिव रवी पवार, राज घुमनकर, गाव गणराज्य घाटीचे सरपंच हरिराम काेटनाके, पाेलीस पाटील सुरेश टेकाम, तंमुस अध्यक्ष देवराव ठलाल, नरेश लाडे, नत्थू दखणे आदी उपस्थित हाेते. विशेष म्हणजे, वडिलांप्रमाणेच रूपचंद हेसुध्दा राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रेरित आहेत.