अपहरण : आरोपींविरोधात अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अहेरी : येथील वार्ड क्रमांक १३ मधील नवविवाहित आरीफ शेख, त्याचा भाऊ व बहिणीला मारहाण करून त्याची पत्नी निधीचे आरोपींनी अपहरण केले. सदर घटना २१ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी अहेरी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये गीता विलास मुप्पीडवार, भाजपचे तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, विश्वहिंदू परिषदेचे संयोजक अमित बेझलवार, संदीप कोरेत, विनोद जिल्लेवार, निधी शेखची काकू यांच्यासह इतर पाच ते सहा जणांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी फरार आहेत. निधी व आरीफ यांचा २० जानेवारी २०१७ रोजी मार्र्कंडा येथील रामप्रसाद महाराज जयस्वाल मराठा धर्मशाळा येथे आंतरधर्मीय विवाह झाला. याबाबतची माहिती निधीच्या नातेवाईकांना माहीत होताच त्यांनी अहेरी येथील काही नागरिकांना सोबत घेऊन २१ जानेवारी रोजी शनिवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास आरीफ शेखचे घर गाठले. यावेळी आरीफचे भाऊ, बहिण व पत्नी निधी उपस्थित होते. आरोपींनी आरीफच्या घराच्या दरवाजाची तोडफोड केली. त्याचबरोबर आरीफसोबत आरीफचा भाऊ व बहिणी व पत्नी निधीला मारहाण केली. त्याचबरोबर निधीचे केस ओढत रस्त्यावर ठेवलेल्या स्कार्पीओ वाहनापर्यंत नेले. त्यानंतर तिला वाहनात टाकून घेऊन गेले. याबाबत आरीफ शेखने अहेरी पोलीस स्टेशनमध्ये २२ जानेवारी रोजी रात्री दीड वाजता तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करून आरोपींविरोधात भादंवि कलम ३६३, ४५२, ३५४, ३२३, १४३, १४६, १४८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक घुरट करीत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी फरार आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणात १० ते १२ आरोपींचा समावेश असल्याची माहिती अहेरीचे ठाणेदार संजय मोरे यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली. (तालुका प्रतिनिधी)
नवविवाहित जोडप्याला मारहाण
By admin | Updated: January 25, 2017 02:02 IST