अहेरी रूग्णालयाचा उपक्रम : शेकडो युवकांनी घेतला सहभागंअहेरी : उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने रक्तदान पंधरवड्याचे आयोजन केले असून या अंतर्गत रक्तदानाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने रविवारी मॅराथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत शेकडो युवकांनी सहभाग घेतला. मॅराथॉन स्पर्धेला अहेरी उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. कन्ना मडावी व धर्मराव विद्यालयाचे शिक्षक प्रविण बुरान यांनी हिरवी झेंडी दाखविली. मॅराथॉन स्पर्धा अहेरी येथील मुख्य मार्गावर घेण्यात आले. या स्पर्धेत प्रमोद येलुरकर याने प्रथम, विक्की गुरूनुले द्वितीय तर कुणाल संतोषवार याने तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कन्ना मडावी म्हणाले की, जगाला बदलविण्याची ताकद आजच्या तरूणांमध्ये आहे. सामाजिक दायित्व ओळखून प्रत्येक तरूणाने रक्तदान केले पाहिजे, रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. रक्त जात, धर्म कधीच पाहत नाही. तो फक्त जीवनासोबत नाते संबंध निर्माण करतो. रक्तदानाविषयी असलेल्या चुकीच्या समजुती युवकांनी दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रक्तदानामुळे दुसऱ्याचे प्राण वाचविल्याचे समाधान मिळते. त्यामुळे रक्तदानासारखे दुसरे दान नाही, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन समुपदेशक संजय उमडवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ सरिता वाघ, शिरीन कुरेशी, त्रिजेश चौबे, गोपाल महतो, अमित झिंगे, स्नेहलता, प्रज्ञा, मुन्ना शेख यांच्यासह उपजिल्हा रूग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
रक्तदान जागृतीसाठी मॅराथॉन
By admin | Updated: June 29, 2015 02:02 IST