आदिवासी विद्यार्थी संघाने मिळविले जोरदार यशगडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत अस्थिर स्थिती या निकालाने निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर गेल्या निवडणुकीच्या जागा कायम राखण्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने यश मिळविला आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना मोठा तडाखा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालाने दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजीमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही अहेरी विधानसभा जनतेने नाकारले असल्याचे निकालावरून दिसून येत आहे. लोकसभा, विधानसभा व नगर पालिका निवडणुकीच्या निकालात भाजपचा असलेला विजयाचा रथ काही अंशी जिल्हा परिषद निवडणुकीने रोखला आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी आशा बाळगली जात होती. मात्र भारतीय जनता पक्ष बहुमतापासून काही जागा दूर आहे. भाजपला आरमोरी विधानसभा क्षेत्रात नऊ जागांवर तर काँग्रेसला पाच जागांवर यश मिळाले आहे. या भागातून शिवसेना संपूर्णत: नामशेष झाली आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात धानोराचा गड कायम राखण्यात काँग्रेसने यश मिळविले आहे. तालुक्यातील मुस्का-मुरूमगाव जागा वगळता संपूर्ण तिन्ही जागा काँग्रेसने कायम राखले आहे. गडचिरोली तालुक्यात काँग्रेसने दोन जागा नव्याने पदरात पाडले आहे. गेल्यावेळी या तालुक्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. यावेळी अॅड. राम मेश्राम व वैशाली किरण ताटपल्लीवार निवडून आल्या आहेत. हे दोन्ही विजयी उमेदवार विधानसभेचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक आहेत. एटापल्ली, मुलचेरा, कोरची व चामोर्शी तालुक्यातही यावेळी काँग्रेसने नव्याने खाते उघडले आहे. मात्र सिरोंचा तालुक्यात गेल्यावेळी दोन जागा मिळाल्या होत्या. यावेळी कॉग्रेस तेथून हद्दपार झाली आहे. मात्र काँग्रेस गेल्यावर्षीच्या जागा कायम राखण्यात यशस्वी झाली. हे काँग्रेसचे मोठे यश आहे. खासदार अशोक नेते यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा पराभव झाल्याने भाजपच्या वर्तुळातही अनेकांना आनंद आहे. डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शीचा गड राखण्यात यश मिळविल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपचे खासदार आमदार व मंत्री सत्ता स्थापन करण्यासाठी कसा प्रयत्न करतात. हे आता लवकरच दिसून येईल.
निकालाने अनेकांना बसले तडाखे; शिवसेना नामशेष
By admin | Updated: February 24, 2017 00:56 IST