संजय मोरे यांचे आवाहन : येल्ला येथील मेळाव्याला हजारो नागरिकांची उपस्थितीमुलचेरा : सर्वसामान्य नागरिकांच्या विकास व कल्याणासाठी शासनाने विविध विभागामार्फत अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांची परिपूर्ण माहिती ठेवावी, तसेच या योजनांचा लाभ घेऊन स्वत:सह गावाचा विकास साधावा, असे आवाहन अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केले. जिल्हा पोलीस प्रशासन व पोलीस ठाणे अहेरीच्या संयुक्त विद्यमाने मुलचेरा तालुक्यातील येल्ला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शुक्रवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन येल्लाचे सरपंच गजानन आलाम यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अहेरीचे पोलीस उपनिरीक्षक किरण दिडवाघ, पोलीस उपनिरीक्षक नीलेश सोळंके, संतोष कराडे, पवित्र रॉय, दिवाकर उराडे, येल्लाचे पोलीस पाटील शंकर शेडमाके, शाळेचे मुख्याध्यापक काझी, ग्रामसेवक डी. एम. राऊत, सुनीता पानेमवार, सुभाष रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी पोलीस विभागातर्फे मॅराथॉन, रांगोळी व विविध सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. पोलीस निरीक्षक मोरे यांनी नक्षल आत्मसमर्पण योजना व पोलीस कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक फौजदार करमरकर, संचालन सहायक शिक्षक गंपावार यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक किरण दिडवाघ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य, कृषी, महसूल, बालकल्याण, आदिवासी विकास, पशु तसेच पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
शासकीय योजनेच्या लाभातून प्रगती साधा
By admin | Updated: April 24, 2016 01:25 IST