अंतर कमी होणार : गोंदिया, राजनांदगावला जाण्यासाठी सोयीस्करदेसाईगंज : केंद्र शासनाने देसाईगंज-साकोली हा राष्ट्रीय महामार्ग घोषीत केला आहे. त्याऐवजी देसाईगंज कोहमारा या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषीत करून त्याचा विकास करावा. कोहमारा मार्ग साकोली मार्गापेक्षा कमी अंतराचा व सोयीस्कर राहील. त्यामुळे सदर मार्गाची निर्मिती करावी अशी मागणी देसाईगंज येथील नागरिकांकडून होत आहे. केंद्र शासनाने घोषीत केलेल्या देसाईगंज-साकोली या मार्गाचे अंतर ६५ किमी आहे. तेथून कोहमारा २२ किमी अंतरावर आहे. मात्र देसाईगंज ते कोहमारा हा मार्ग केवळ ६० किमी अंतराचा आहे. गोंदिया, राजनांदगाव या जिल्हा ठिकाणी जाण्यासाठी देसाईगंजवासीयांना देसाईगंज-कोहमारा हा मार्ग सरळ पडतो. त्यामुळे बहुतांश प्रवाशी याच मार्गाने प्रवास करतात. देसाईगंज-कोहमारा मार्गाची निर्मिती केल्यास २० किमीचा फेरा कमी होईल. कोहमारा मार्ग अगोदरच दुपरी स्वरूपात अस्तित्वात आहे. त्यामुळे जमीन हस्तांतरणाचाही प्रश्न निर्माण होत नाही. देसाईगंज-साकोली मार्गाचे रूंदीकरण करण्यासाठी जमीन हस्तांतरण करावे लागेल. त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहिन होण्याचा धोका आहे. त्यामुळे देसाईगंज-कोहमारा या मार्गाला पहिली पसंती देऊन या मार्गालाच राष्ट्रीय महामार्ग घोषीत करणे सोयीचे होणार आहे.देसाईगंज-कोहमारा मार्गावर नवेगाव बांध, इटियाडोह यासारखे पर्यटनस्थळे पडतात. परिणामी प्रवाशी याही स्थळांना भेटी देऊन पुढचा प्रवास करू शकतात. देसाईगंज, गोंदिया येथील नागरिकांसाठी हा मार्ग सोयीचा ठरणार आहे. (वार्ताहर)
देसाईगंज-कोहमारा मार्गाला राष्ट्रीय महामार्ग करा
By admin | Updated: November 30, 2015 01:19 IST