नक्षलग्रस्त भागात सेवा : जिल्ह्यात ३० वैद्यकीय अधिकारी कार्यरतमानापूर/देलनवाडी : गडचिरोली जिल्ह्यासह राज्यात १६ वर्षांपासून बीएएमएस असलेले वैद्यकीय अधिकारी रुग्णांना सेवा देत आहेत. मात्र राज्य सरकारने या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम केलेले नाही. त्यामुळे या वैद्यकीय अधिकाऱ्यांना राज्य सरकारने न्याय द्यावा, अशी मागणी त्यांच्या संघटनेने केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षल प्रभावित भागात सुमारे ३० बीएएमएस पदवीधारक वैद्यकीय अधिकारी सेवा देत आहे. येथे एमबीबीएस डॉक्टर सेवा देण्यासाठी येण्यास इच्छुक राहत नाही. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेची संपूर्ण जबाबदारी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांवरच येऊन पडली आहे. जिल्ह्यात जे एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी आहेत ते एनपीए उचलूनही आपली खासगी दुकानदारी शहरात चालवित आहे. ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. बीएएमएस डॉक्टर चांगले काम करीत असतानाही त्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. ६ सप्टेंबर २०१६ च्या विषय समितीमध्ये अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय झाला होता. मात्र या निर्णयाला गती मिळाली नाही. त्यामुळे एकूण ३५ वैद्यकीय अधिकारी गडचिरोली जिल्ह्यात अस्थायी आहेत. राज्यात ७९१ अस्थायी बीएएमएस वैद्यकीय अधिकारी आहेत. अस्थायी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजाविणारे मोना गायकवाड या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अकाली मृत्यू झाला. २००९ मध्ये १६ हजार ९ एमबीबीएस डॉक्टरांना स्थायी करण्यात आले. मात्र बीएएमएस डॉक्टरांना शासनाने न्याय दिला नाही, अशी भावना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेने व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्थायी करा
By admin | Updated: October 14, 2016 01:49 IST