गडचिराेली : गडचिराेली नगर परिषदेकडे असलेला स्वर्गरथ सध्या काेराेना रुग्णांच्या मृतदेहांची वाहतूक करण्यात व्यस्त आहे. सामान्य नागरिकांसाठी एक अतिरिक्त स्वर्गरथ खरेदी करावा, अशी मागणी काॅंग्रेस अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत माेटघरे यांनी केली आहे.
काेराेनामुळे मृतकांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे दिवसभर काेराेनाने मृत्यू झालेल्या नागरिकांचे शव स्मशानभूमीत नेण्यातच गडचिराेली नगर परिषदेचा स्वर्गरथ व्यस्त राहत आहे त्यामुळे सामान्य व्यक्ती मरण पावल्यास वेळेवर स्वर्गरथ मिळत नाही. तसेच काेराेना रुग्णांचाच स्वर्गरथ पुन्हा सामान्य व्यक्तीचा मृतदेह वाहून नेण्यासाठी वापरला जातेे. यामुळे इतर नागरिकांनाही काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेने स्थानिक विकास निधीतून एक स्वर्गरथ खरेदी करावा किंवा शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी माेटघरे यांनी केली आहे.