अहेरी : छत्तीसगड राज्यातून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असलेले वाहन अडवून २६ जनावरांना जीवदान देण्यात आले आहे. सदर कारवाई येल्ला येथील प्राणहिता घाटाजवळ रविवारी करण्यात आली आहे.छत्तीसगड राज्यातून जनावरे खरेदी करून ती अहेरीमार्गे तेलंगणा राज्यात नेली जात असल्याची गुप्त माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी येल्ला गावाजवळ पाळत ठेवली. जनावरे भरलेले वाहन अडवून तपासणी केले असता, वाहनात १३ गायी, सात बैल व सहा वासरे आढळून आली. आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या जनावरांना येल्ला ग्रामपंचायतीच्या मरपल्ली गावातील कोंडवाड्यात ठेवण्यात आले. सदर कारवाई पोलीस निरिक्षक संजय मोरे, पोलीस हवालदार पवित्र रॉय, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री अमित बेझलवार, उपाध्यक्ष रवी नेलकुद्री, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक अमोल मुक्कावार, सहसंयोजक देवेंद्र खतवार, संदीप कोरेत, नगर संयोजक नितीन बोमनवार, नामदेव आत्राम, गुरूमर्ती गौर यांनी केली.छत्तीसगड राज्यात व गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील गावांमधून जनावरे खरेदी करून सदर जनावरे कत्तलीसाठी तेलंगणात विक्री करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. सदर वाहने अहेरी मार्गानेच नेली जातात. त्यामुळे पोलिसांनी या मार्गावर कायम पाळत ठेवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
कत्तलीसाठी जाणाऱ्या २६ जनावरांना जीवदान
By admin | Updated: September 22, 2015 02:48 IST