लखनगुडा येथील मेळावा : उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थितजिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा उपपोलीस ठाण्याच्या वतीने लखनगुडा येथे सोमवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते २० लाभार्थी शेतकऱ्यांना स्प्रेपंप, ताडपत्री, ६ लाभार्थ्यांना किराणा दुकानाचे धनादेश व इतर लाभार्थ्यांना कपडे व खेळाचे साहित्य वितरित करण्यात आले.या मेळाव्याचे उद्घाटन जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी जिमलगट्टा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत मुसळे होते. प्रमुख अतिथी म्हणून वाचक फौजदार विपट, प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे निरीक्षक मट्टामी, जिमलगट्टाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित ढगे, शिक्षक शेख, किष्टापूरचे ग्रामसेवक नन्नावरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव म्हणाले, पोलीस विभाग व शासन आदिवासी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. लोकांच्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यासाठी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी सदैव तत्पर राहतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या मेळाव्यादरम्यान गोळाफेक, रांगोळी, संगीतखुर्ची आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये ३० ते ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी पोलीस अधिकारी शशिकांत मुसळे यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक सुरवसे यांनी मानले.या मेळाव्याला जिमलगट्टा परिसरातील जवळपास ३५० ते ४०० नागरिक उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जिमलगट्टा ठाण्याचे पोलीस हवालदार पुल्लीराजू कोनमवार, स्वामी दासरी, क्रिष्णा घुटके व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देऊन या योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अतिदुर्गम भागात जनजागरण मेळावा घेण्याचा उद्देश प्रभारी अधिकारी शशिकांत मुसळे यांनी विशद केला. (वार्ताहर)
५० लाभार्थ्यांना साहित्य वितरण
By admin | Updated: April 28, 2016 01:12 IST